मनपा शाळांत आता तासिका शिक्षक
By admin | Published: October 30, 2015 11:30 PM2015-10-30T23:30:53+5:302015-10-30T23:30:53+5:30
आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आता पालिकेने तासिका शिक्षक घेण्याचा निर्णय घेतला आहे
ठाणे : आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आता पालिकेने तासिका शिक्षक घेण्याचा निर्णय घेतला आहे. असा प्रस्ताव स्थायीने मंजूर केला असून त्यांना तासिकेला ६० रुपये याप्रमाणे मानधन दिले जाईल.
ठाणे महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या १० माध्यमिक शाळा आहेत. त्यामध्ये आजच्या घडीला २०१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. साधारणपणे प्राथमिक शाळेतील प्रत्येक तुकडीत सुमारे ६० विद्यार्थी व माध्यमिक शाळेत सुमारे ७० विद्यार्थी आहेत. आरटीई अॅक्ट २००९ नुसार इयत्ता १ ली ते ५ वीची आवश्यक पटसंख्या ३० असून इयत्ता ६ वी ते ८ वीपर्यंतची पटसंख्या ३५ आहे. तसेच इयत्ता ९ वी व १० वीसाठी कमाल पटसंख्या ४५ असणे आवश्यक आहे. हा अहवाल विचारात घेता ठाणे महापालिकेच्या माध्यमिक शाळा आरटीई अॅक्ट २००९ नुसार विहित केलेल्या पटसंख्येनुसार जास्त विद्यार्थी संख्या असल्याने मुलांचा शैक्षणिक दर्जा खालावत आहे.
यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण विभागातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून गुणवत्ता विकास करण्याकरिता तसेच महापालिकेतील सेवानिवृत्त शिक्षकांची तासिका तत्त्वावर सेवा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.