आता लक्ष ठाणे जिल्हा बँक निवडणूक निकालाकडे
By Admin | Published: May 7, 2015 12:21 AM2015-05-07T00:21:53+5:302015-05-07T00:21:53+5:30
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपली सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या ‘सहकार’ पॅनलने चांगलीच ताकद पणाला लावली.
जितेंद्र कालेकर, ठाणे
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपली सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या ‘सहकार’ पॅनलने चांगलीच ताकद पणाला लावली, तर प्रतिस्पर्धी वसई विकास आघाडीच्या ‘लोकशाही सहकार’ पॅनलनेही त्यांना कडवे आव्हान दिले. विक्रमी मतदान झाल्यामुळे वाढलेली मते सत्ताधाऱ्यांना किती फायदेशीर ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्याचे सत्ताकारण आणि ‘अर्थकारण’ याच बँकेभोवती फिरत असल्यामुळे या ठिकाणी सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये नेहमीच चढाओढ असते. माजी अध्यक्ष कपिल पाटील यांच्यासह आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आ. विष्णू सवरा आणि शिवसेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांनीच निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वपक्षीय ‘सहकार’चे आठ आणि ‘लोकशाही सहकार’चे दोन उमेदवार असे १० बिनविरोध निवडून आले. आता ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकारला अवघ्या तीनची गरज असली तरी बहुमताने निवडून येऊ आणि बँकेवरील सत्ताही मिळवू, असा विश्वास ‘सहकार’च्या बाबाजी पाटील, देविदास पाटील, अशोक पोहेकर या माजी अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. तर, आमचे संपूर्ण पॅनल विजयी होईल, असा दावा लोकशाहीच्या शिवाजी शिंदे यांनी केला आहे.
पालघरमधून वासुदेव पाटील, मधुकर पाटील, अनिल गावड तर पगारदारमधून भाऊ कुऱ्हाडे, सावकार गुंजाळ आणि शिवाजी पाटील यांच्यात लढत झाली. खरेदी-विक्री संघातून सीताराम राणे, शिवाजी शिंदे आणि वसंत पोलाडिया यांच्या लढतीकडेही सर्वांचे विशेष लक्ष आहे.
या निवडणुकीची ७ मे रोजी ठाण्याच्या वर्तकनगर येथील थिराणी हायस्कूल या शाळेत सकाळी ८ ते दुपारी २ वा. मतमोजणी होणार आहे.