आता गुन्हेगार सुटणार नाही, तर अडकणार; दोष सिद्धीचा ठाणे पॅटर्न राज्यभर राबविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 05:26 AM2023-05-26T05:26:29+5:302023-05-26T05:26:45+5:30
गुन्ह्यांची कबुली न दिल्यामुळे आरोपींनाही न्यायालयीन प्रक्रियेसाठी तसेच जामिनासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत होता.
- जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वर्षानुवर्षे चालणारे गुन्हे, आरोपीच न मिळाल्यामुळे त्यांच्यावरील दोष सिद्ध होण्याच्या प्रमाण घटले होते. मात्र, अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात आयोजित शिबिरात हे चित्र ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समुपदेशनामुळे बदलले. अवैध मद्यविक्री व निर्मितीच्या ५३ गुन्ह्यांमध्ये ५५ आरोपींवर कारवाई झाली. त्यामुळे ठाण्याचा हाच पॅटर्न आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यभर राबविला जाणार असल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉ. नीलेश सांगडे यांनी बुधवारी दिली.
गुन्ह्यांची कबुली न दिल्यामुळे आरोपींनाही न्यायालयीन प्रक्रियेसाठी तसेच जामिनासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. अशा अनेक बाबींचे ठाण्याचे अधीक्षक डॉ. सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ निरीक्षक व २४ उपनिरीक्षक यांनी आरोपी तसेच त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले.
अधिकाऱ्यांनी डोळ्यांत अंजन घातल्यामुळे आरोपींनीही गुन्हा कबूल केला. आराेपींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड झाल्याने एकाच दिवसात १४ लाख २५ हजारांचा दंड शासनाकडे जमा झाला. ठाणे पॅटर्नची उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दखल घेतली. ठाण्याचा हा पॅटर्न आता राज्यभर राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
अवैध मद्यविक्री, निर्मितीमधील गुन्हेगारांना पकडताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. आरोपींना पकडूनही अनेक वेळा ते गुन्ह्यांची कबुली देत नव्हते. या गुन्ह्यात तीन ते पाच वर्षांची शिक्षा किंवा २५ हजारांचा दंडाच्या शिक्षेबाबत समुपदेशन केले. दारूबंदीच्या गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढवले तर आरोपींवर जरब राहील. अवैध मद्यविक्री, निर्मितीला आळा बसेल.
- डॉ. नीलेश सांगडे, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, ठाणे