आता पालिकेची उद्याने सुद्धा फेरीवाल्यांना आंदण;

By धीरज परब | Published: December 4, 2023 08:09 PM2023-12-04T20:09:56+5:302023-12-04T20:10:29+5:30

मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या संकल्पनेतून संडे गार्डन नावाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे .

Now the municipal parks are also fun for hawkers; | आता पालिकेची उद्याने सुद्धा फेरीवाल्यांना आंदण;

आता पालिकेची उद्याने सुद्धा फेरीवाल्यांना आंदण;

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने रविवारच्या दिवशी ३ उद्याने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याचा संडे गार्डन नावाचा उपक्रम सुरु केला असला तरी ह्या उद्यानात फळ विक्रेते , रस विक्रेते आदी फेरीवाल्यांना पालिकेनेच आंदण दिले आहे . आधीच शहरातील वर्दळीचे मुख्य रस्ते , पदपथ , नाके , रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने व्यापले असताना आता उद्याने सुद्धा त्यांच्यासाठी पालिकेने खुली केल्याने टीकेची झोड उठत आहे . 

मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या संकल्पनेतून संडे गार्डन नावाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे . भाईंदर पूर्वेची जेसलपार्क चौपाटी , पश्चिमेचे सालासर  उद्यान व मीरारोडच्या कनकिया येथील  सावित्रीबाई फुले उद्यान हि दर रविवारी पूर्ण दिवस नागरिकांना खुली करण्यात आली आहेत . २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत हि उद्याने रविवारी पूर्ण दिवस खुली राहणार आहेत . 

ह्या  उपक्रमाचा शुभारंभ आयुक्त काटकर यांनी सावित्रीबाई फुले उद्यानातून केला . यावेळी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर , उपायुक्त कल्पिता पिंपळे , मारुती गायकवाड आदी उपस्थित होते . ह्या उपक्रमात दर रविवारी सायंकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान नागरिकांसाठी नृत्य , गाणी , मिमिक्री आदी विविध कला व मनोरंजन क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन महापालिका करणार आहे . 

पालिकेच्या संडे गार्डन उपक्रमाचे एकीकडे स्वागत होत असताना दुसरीकडे उद्यानात पालिकेने फळ विक्रेते , रस विक्रेते आदी  फेरीवाल्यांना बसवल्याने संताप व्यक्त होत आहे . आधीच शहरातील रस्ते , पदपथ , नाके , रेल्वे स्थानक परिसर आदी महापालिकेने फेरीवाल्यांना आंदण दिले आहेत . त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांना चालणे सुद्धा जिकरीचे झाले आहे . त्यातच आता उद्यान देखील फेरीवाल्याना आंदण दिल्याने जागरूक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे . ह्या बाबत उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी संपर्क साधला असता आपण बैठकीत व्यस्त असल्याचे त्या म्हणाल्या . 

Web Title: Now the municipal parks are also fun for hawkers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.