आता झिका व्हायरस व्हायरसचा धोका, जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:13+5:302021-07-18T04:28:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यात कोरोना कमी होत असतानाच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यात कोरोना कमी होत असतानाच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात फवारणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील यासाठी सज्ज झाली आहे. सध्या जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव नसला तरी सर्वांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्यातही या व्हायरसचा धोका गरोदर महिलांना अधिक असल्याने त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
झिका हा आजार मच्छर चावल्याने होतो. हे वायरल इन्फेक्शन आहे. डेंग्यू व्हायरसप्रमाणेच याची लक्षणे दिसून येतात. आफ्रिकेमधून हा आजार भारतात आला आहे. मच्छर रोजच माणसांना चावत असतात. परंतु, ज्या मच्छरमध्ये याचा प्रसार झालेला असतो, तो मच्छर माणसाला चावल्यास त्यातून या आजाराची लागण होत असते. हे वायरल इन्फेक्शन असल्याने त्यावर वेगळे असे उपचार काहीच नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी फवारणी करणे, पाणी साचू न देणे आदी उपाय करणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.
झिका कशामुळे होतो?
झिका हा आजार एडीस एजिप्ती नावाच्या मच्छर चावल्याने हे वायरल इन्फेक्शन होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यातही हा मच्छर आधी इन्फेक्टेड असेल आणि तो जर चावला तर त्यातून हा आजार होत असतो.
लक्षणे काय?
मच्छर चावल्यानंतर ३ ते १० दिवसांत ताप येणे, अंगदुखी आणि लाल रॅशेस अंगावर दिसून येतात. हीच या वायरल इन्फेक्शनची लक्षणे आहेत. त्यातही सामान्य माणसाला याचा धोका दिसून येत नाही. त्याने योग्य उपचार घेतल्यानंतर तो बरा होतो. परंतु, गरोदर मातेला जर हा मच्छर चावला तर त्यांना होणाऱ्या बाळाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याच्या डोक्याची वाढ होत नसल्याचेही सांगितले जात आहे.
उपाययोजना काय?
हे एक प्रकारचे वायरल इन्फेक्शन असल्याने यात ताप येणे, डोकेदुखी किंवा अंगावर लाल रॅशेस उठतात. त्यामुळे तापावरील औषधे दिली जातात. डोकेदुखी असेल तर त्यानुसार गोळ्या दिल्या जातात. एकूणच जी जी लक्षणे दिसून येतात, त्यानुसार रुग्णावर उपचार केले जातात. तसेच अधिकचे पाणी पिण्याच्या सूचनाही यात दिल्या जातात.
...........
जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे. आवश्यक ते बेडदेखील उपलब्ध करून देण्याची तयारी केलेली आहे. सर्वांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
(कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे)
..........
झिका हा आजार एडीस एजिप्ती नावाचा मच्छर चावल्याने होतो. यात ३ ते १० दिवसांत ताप येणे, डोकेदुखी आणि अंगावर लाल रॅशेस उठणे अशी लक्षणे दिसून येतात. हा आजार एक वायरल इन्फेक्शन असल्याने त्यानुसार त्यावर उपचार केले जातात.
(डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे)