स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वॉच
By admin | Published: January 15, 2017 05:15 AM2017-01-15T05:15:23+5:302017-01-15T05:15:23+5:30
वारंवार कारवाई करूनही स्टेशन परिसरातील फेरीवाले हटत नसल्याने आता हतबल झालेल्या ठाणे महापालिकेने या परिसरातील फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची
ठाणे : वारंवार कारवाई करूनही स्टेशन परिसरातील फेरीवाले हटत नसल्याने आता हतबल झालेल्या ठाणे महापालिकेने या परिसरातील फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची नजर ठेवण्याची योजना पुढे आणली आहे. परंतु,यापूर्वी सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, तीन शिफ्टमध्ये उपायुक्तांच्या नेमणुका करूनही या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. त्यात, या भागातील व्यापाऱ्यांनी या फेरीवाल्यांविरोधात पुन्हा एल्गार पुकारल्याने नाइलाजास्तव आयुक्तांना आता हा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्टेशन परिसर ते जांभळीनाका या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण केले. त्यानंतर, हा परिसर ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषितही केला. परंतु, रुंद झालेल्या रस्त्यांवर पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने येथील व्यापारीवर्ग हैराण झाला. तसेच पालिकाही त्यांच्यावर वारंवार कारवाई करीत आहे. सुरुवातीला त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हींची संकल्पना मांडली होती. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या एका संयुक्त पथकाची घोषणाही मध्यंतरी झाली होती. त्यानंतरही अतिक्र मणांचा विळखा कायम असल्याने आयुक्तांनी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना वार ठरवून या भागातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोणताही अधिकारी नेमून दिलेल्या दिवशी या भागात फिरकत नसल्याचे स्पष्ट होत आहे. पालिकेची पथके या भागात कारवाईसाठी तैनात असली तरी ते कारवाईसाठी येणार असल्याची खबर व्हॉट्सअॅपवरून फेरीवाल्यांना दिली जाते आणि काही वेळासाठी तेया भागातून गायब होतात, अशी
तक्रार व्यापाऱ्यांनीच आयुक्तांकडे केली होती.
एकूणच वारंवार कारवाई करूनही फेरीवाले येथून हटत नसल्याने आता कारवाईदरम्यान फेरीवाले पळून जात असतील, तर त्यावर ड्रोन कॅमेऱ्याने पाळत ठेवून कडक कारवाई करा, असे आदेश आयुक्तांनी शनिवारी बैठकीत दिले. मात्र, सॅटीसच्या पुलाखाली जर फेरीवाले बसत असतील, तर तिथे ड्रोन कॅमेरे उडवणार कसे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याशिवाय, ड्रोन कॅमेरे वापरणाऱ्या तंत्रज्ञांना फेरीवाले आणि पालिकेचे भ्रष्ट कर्मचारी हाताशी धरणार नाहीत, याची शाश्वती काय? पालिकेची पथके कारवाईसाठी येतात, याची खबर जर त्यांना लागते, तर ड्रोन कॅमेऱ्यांची देखरेख त्यांना कळणार नाही का, असे सवाल उपस्थित होत आहेत. (प्रतिनिधी)