आता आम्हालाही केडीएमसीत असुरक्षित वाटते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:22 AM2019-03-04T00:22:14+5:302019-03-04T00:22:26+5:30

केडीएमसीच्या लिपिकाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याने महापालिकेची बदनामी झाली आहे.

Now we feel insecure in the KDMS | आता आम्हालाही केडीएमसीत असुरक्षित वाटते

आता आम्हालाही केडीएमसीत असुरक्षित वाटते

Next

कल्याण : केडीएमसीच्या लिपिकाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याने महापालिकेची बदनामी झाली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. या प्रकारामुळे आम्हालाही असुरक्षित वाटत असल्याची भावना नगरसेविकांनी व्यक्त करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मालमत्ताकर भरण्याची मुदत वाढवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी कर विभागातील लिपिक रमेशचंद्र राजपूत याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. शिवसेना सदस्य वामन म्हात्रे म्हणाले, ‘महापालिकेची प्रतिमा यापूर्वी भ्रष्ट होती. मात्र, भ्रष्टाचाराचा वेगळाच प्रकार महापालिकेत राजपूत यांच्या प्रकरणानंतर उघड झाला आहे. त्यामुळे महापालिकेची प्रचंड बदनामी झाली आहे.’ तर, सदस्य कस्तुरी देसाई म्हणाल्या, या प्रकारामुळे आम्हा नगरसेविकांनाही असुरक्षित वाटत आहे. नागरिकांच्या समस्या व विविध विकासकामांसाठी आम्ही विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडे जात असतो. या प्रकरणानंतर आम्ही अधिकाऱ्यांकडे कामानिमित्त जायचे की नाही, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. आम्हाला काहीच सुरक्षितता नसते. त्यामुळे अशा प्रकारची हिंमत यापुढे कुठलाही अधिकारी करणार नाही, हे सांगता येत नाही. यासाठी राजपूत प्रकरणात कठोर कारवाई केली जाणे अपेक्षित आहे, अशी मागणी त्यांनी केली.
सदस्य शालिनी वायले म्हणाल्या, ‘आम्हाला महिला सुरक्षारक्षक पुरवा. एखाद्या महिलेशी असे वर्तन करण्याची एका लिपिकाची कशी काय हिंमत होते? वरिष्ठांचा त्यावर काहीच वचक नाही. राजपूतविरोधात कठोर कारवाई करावी झालीच पाहिजे.’
शिवसेना सदस्य प्रियंका भोईर यांनी हा प्रकार निषेधार्ह आहे. राजपूतला निलंबित न करता त्याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. सदस्यांच्या भावना तीव्र आणि संतापजनक आहे. त्यांच्या भावनांशी समिती सहमत असल्याचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
>अहवालानंतर कारवाई
राजपूत याला या प्रकरणात केवळ निलंबित न करता त्याला महापालिकासेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असे आदेश उपायुक्त मिलिंद धाट यांना दिले आहेत. उपायुक्त धाट यांनी राजपूत याच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समितीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवून पुढील कार्यवाही केली जाईल. त्यानुसार, कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Now we feel insecure in the KDMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.