आता कल्याण कनेक्टिव्हिटी हब; वाहतुकीचे जाळे सक्षम

By admin | Published: January 1, 2017 03:46 AM2017-01-01T03:46:39+5:302017-01-01T03:46:39+5:30

कल्याण हे वाहतुकीच्या दृष्टीने जंक्शन आहे. रेल्वे व रस्ते मार्ग सर्व कल्याणकडे येतात. त्यामुळे कल्याणहून नवी मुंबई, मुंबई, पुणे, नाशिक या दिशेने सगळीकडे जाता येते.

Now the Wellness Connectivity Hub; Traffic network enabled | आता कल्याण कनेक्टिव्हिटी हब; वाहतुकीचे जाळे सक्षम

आता कल्याण कनेक्टिव्हिटी हब; वाहतुकीचे जाळे सक्षम

Next

- मुरलीधर भवार, कल्याण
कल्याण हे वाहतुकीच्या दृष्टीने जंक्शन आहे. रेल्वे व रस्ते मार्ग सर्व कल्याणकडे येतात. त्यामुळे कल्याणहून नवी मुंबई, मुंबई, पुणे, नाशिक या दिशेने सगळीकडे जाता येते. कल्याण हे भविष्यात कनेक्टीव्हिटी हब होऊ शकते. त्यादृष्टीने राज्य सरकार विविध प्रकल्पांद्वारे पाऊले टाकत आहे. काही प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे तर काही प्रकल्प सल्लागार नेमण्याच्या पातळीपर्यंत पोहोचले आहेत. प्रकल्प मोठे असल्याने त्यांचे कामही दीर्घ काळ चालणार आहे. २०१६ मध्ये या प्रकल्पांसाठी काही सकारात्मक पाऊले उचलली गेल्यास २०१७ पर्यंत त्यांची कामे प्रत्यक्ष सुरू होण्याच्या मार्गावर असतील. त्यादृष्टीने कल्याण हे कनेक्टीव्हीटी हब होण्याच्या दृष्टाने वाटचाल करू शकते. त्यासाठी प्रकल्पांना गती देण्याची गरज आहे.
कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे मार्गावरील मोठे जंक्शन आहे. ठाकुर्ली येथे कल्याण टर्मिनस उभारण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. त्यामुळे या टर्मिनसचा रखडलेला विषय मार्गी लागणार आहे. ठाकुर्लीत प्रस्तावित असलेल्या या टर्मिनसच्या जागेवर दोन वर्षांपूर्वीच लोकलसाठी कारशेड बनवण्यात आले आहे. त्याचा फायदा कल्याण रेल्वे टर्मिनसला होणार आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटीतून केडीएमसी हद्दीतील सात स्थानकांपैकी कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा या रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.
त्या पुढचे पाऊल म्हणजे ठाणे-कल्याण मेट्रो रेल्वेला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. हा प्रकल्प येत्या चार वर्षांत मार्गी लागणार आहे. त्यामुळे भिवंडी रेल्वेने जोडली जाईल. भिवंडीला ठाणे आणि कल्याण ही दोन्ही स्थानकेजवळ पडतील. ठाणे-भिवंडी मेट्रो रेल्वे मंजूर झाल्यावर ठाणे-मुंब्रा बायपास-शीळफाटा मेट्रो रेल्वे शक्य आहे का, याचीही पाहणी करण्यात आली आहे. नवी मुंबईपासून तळोजापर्यंत मेट्रो रेल्वे येत आहे. तळोजा ते कल्याण जोडले, जावे अशी मागणी पुढे आली आहे. मेट्रो रेल्वे टप्प्याटप्प्याने विकसित केली जाणार आहे. त्यामुळे या मागण्यांचा विचार पुढे होऊ शकतो. कदाचित तो लवकरच मंजूरही केला जाऊ शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांमधील १० गावांच्या हद्दीत कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्यास मंजुरी दिली. १ हजार ८९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये सेंट्रल बिझनेस सेंटर उभारले जाणार आहे. हे सेंटर कोळेगावनजीक आहे. त्यामुळे कल्याण शीळ रस्ता, नव्याने होणारा एलिव्हेटेड रस्ता आणि तळोजा-कल्याण, शीळ-मुंब्रा-ठाणे मेट्रो जोडली गेल्यास सर्व वाहतुकीच्या सुविधांनी हा मार्ग होईल.
कल्याण-डोंबिवली महापालिका ८०० कोटी खर्चून रिंगरूट प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. एमएमआरडीएतर्फे हा प्रकल्प केला जाणार आहे. याशिवाय कल्याण खाडीवरील दुर्गाडी खाडी पुलाला समांतर सहा पदरी नवा पूल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच डोंबिवलीतील मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडी पुलाचे कामही सुरू झाले आहे.

Web Title: Now the Wellness Connectivity Hub; Traffic network enabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.