एनआरसी वसाहतीची वीज-पाणी तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 12:06 AM2021-03-02T00:06:54+5:302021-03-02T00:07:05+5:30
एनआरसी कंपनीच्या आवारातील कामगार वसाहतीत ८०० कामगारांची घरे आहेत. त्यापैकी काही ठिकाणी कामगार राहतात. जी घरे रिकामी आहेत ती पाडण्याचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : एनआरसी कंपनी अदानी समूहाने लिलावात घेतल्याने कामगार वसाहतीमधील घरे पाडण्याचे काम सुरू झाले आहे. वसाहतीमधील वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा रविवारी सायंकाळपासून खंडित झाला आहे. यापूर्वी रहिवाशांचे पाणी तोडले आहे. वसाहतीमधील नागरिकांनी घरे रिकामी करावीत याकरिता हे पाऊल उचलल्याचा आरोप रहिवाशांनी केला.
एनआरसी कंपनीच्या आवारातील कामगार वसाहतीत ८०० कामगारांची घरे आहेत. त्यापैकी काही ठिकाणी कामगार राहतात. जी घरे रिकामी आहेत ती पाडण्याचे काम सुरू आहे. या पाडकामाला कामगारांचा विरोध आहे. कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना पाडकाम कसे काय केले जात आहे. दोन महिन्यांपासून कामगार वारंवार पाडकामाला विरोध करीत आहेत. आता वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा करणारी वाहिनी जेसीबीमुळे तुटली किंवा जळाली असे सांगण्यात येत आहे. अदानीने कंपनीची जागा घेतली आहे. त्यांच्याकडून ताबा घेणे सुरू आहे. मात्र या ताबापत्रात घरे तोडण्यास परवानगी दिली आहे का, असा सवाल कामगारांनी केला आहे. यापूर्वी कामगार वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा आणि आता वीजपुरवठा खंडित झाला आहे. कामगार वसाहतीमधील नागरिकांना त्रास देऊन त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप कामगार रामदास पाटील यांनी केला.
शुक्रवारी मुंबईत होणार बैठक
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता सह्याद्री अतिथी गृहावर एक बैठक बोलावली आहे. या बैठकीस संबंधितांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. एनआरसी कामगार संघर्ष समितीचे भीमराव डोळस यांनी एनआरसी प्रकरणात आठवले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली होती.