एनआरसी वसाहतीत ना वीज ना पाणी!
By admin | Published: April 22, 2016 01:56 AM2016-04-22T01:56:50+5:302016-04-22T01:56:50+5:30
एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे.
कल्याण : एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ही वसाहत पाच दिवसांपासून अंधारात आहे. विजेअभावी वसाहतीतील नागरिकांना घरात पाणीही मिळत नाही. परिणामी, महिलांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते. संतप्त रहिवाशांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली मुख्यालयात धाव घेतली.
एनआरसी कंपनीने ९ नोव्हेंबर २००९ ला आर्थिक डबघाईचे कारण पुढे करीत कंपनीला टाळे ठोकले. कापड उद्योगनिर्मितीत असलेल्या कंपनीचा आशिया खंडात नावलौकिक होता. कंपनीने कामगारांसाठी वसाहत उभारली होती. जवळपास १४०० सदनिका या वसाहतीत आहेत. कंपनी बंद पडल्यावरही त्यात तीन हजार कामगार व त्यांचे कुटुंबीय राहत आहेत. कंपनीने कामगारांची थकीत देणी अजूनही दिलेली नाहीत. तो वाद न्यायप्रविष्ट आहे. मालकाने कंपनीची जागा विकली असून तो व्यवहारही वादग्रस्त ठरला आहे.
एनआरसी वसाहतीला महावितरणकडून वीजपुरवठा होत आहे. त्याचे बिल कंपनी भरत होती. परंतु, सध्या कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली आहे. यापूर्वीही वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. जवळपास नऊ कोटी रुपयांची थकबाकी कंपनी व्यवस्थापनाने भरली नाही. त्यामुळे महावितरणने एनआरसी वसाहतीचा वीजपुरवठा पाच दिवसांपूर्वी खंडित केला आहे. त्यामुळे वसाहतीमधील पाणीपुरवठाही बंद झाला आहे. पाणी आणि विजेविना आम्ही त्रस्त आहोत, असे फरिदा पठाण, सुनंदा लोंढे, प्राजक्ता कूळधरण, श्रीकांत कांबळे, सूर्यप्रताप सिंग आणि रोहित सोनावणे या रहिवाशांनी सांगितले.
वसाहतीमधील रहिवाशांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत गुरुवारी धाव घेतली. यावेळी महिलांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांची भेट घेतली. वसाहतीला टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. तेथे एका नळाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, जोपर्यंत थकबाकी भरली जात नाही, तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. (प्रतिनिधी)