अनिवासी भारतीय महिलेला लाखोंचा गंडा
By admin | Published: February 21, 2017 03:52 AM2017-02-21T03:52:15+5:302017-02-21T03:52:15+5:30
ठाण्याच्या कोलबाड भागातील अनिवासी भारतीय (सध्या रा. कुवेत) ५८ वर्षीय महिलेने ठाण्यातील अॅन्थोनी फर्नांडिस या मानलेल्या
ठाणे : ठाण्याच्या कोलबाड भागातील अनिवासी भारतीय (सध्या रा. कुवेत) ५८ वर्षीय महिलेने ठाण्यातील अॅन्थोनी फर्नांडिस या मानलेल्या भावाला सदनिका खरेदीसाठी नियुक्त केले होते. याचाच गैरफायदा घेऊन फर्नांडिस दाम्पत्याने सुमारे ७० लाख रुपये लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार महिला मूळ डोंबिवलीची रहिवासी आहे. महाविद्यालयात असल्यापासूनच्या मैत्रीमुळेच त्यांनी अॅन्थोनीला भावाप्रमाणे मानले आहे. व्यवसायानिमित्त त्यांचे मलेशिया, कुवेत असे नेहमीच परदेश दौरे असल्यामुळे ठाण्यात घर घेण्यासाठी त्यांना वेळ मिळत नव्हता. अखेर, त्यांनी ही जबाबदारी आपले कौटुंबिक संबंध असलेल्या फर्नांडिस दाम्पत्यावर सोपवली. त्यानुसार, दोन सदनिका तो त्यांना घेऊन देणार होता. त्यापोटी त्याने ९ ते १९ फेब्रुवारी २०१७ रोजी दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे ७० लाखांची रक्कम घेतली. त्याने सदनिकाखरेदी केल्याचे भासवून त्याची कागदपत्रेही ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील दुयम निबंधक कार्यालयात बनवली. यासाठी तक्रारदार महिलेच्या नावाने सदनिका विकत घेण्याऐवजी अॅन्थोनीने स्वत:च्या नावाने ती घेतली. ही महिला आणि बिल्डर सुरेश म्हात्रे यांच्याशी व्यवहार करून ते पैसे किंवा सदनिकाही त्याने दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने अखेर ठाणे न्यायालयाला याबाबतची माहिती देऊन तक्रार दाखल केली. ठाणे न्यायालयाने राबोडी पोलिसांना याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिल्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात अॅन्थोनी आणि रेजिना या दाम्पत्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून लवकरच या दोघांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)