भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात नऊवर्षीय मुलगी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:11 AM2019-03-19T05:11:04+5:302019-03-19T05:11:19+5:30
साईनाथनगर परिसरात खेळत असलेल्या नऊवर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मुस्कान अन्वर शेख (९) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला नऊ टाके पडले असून डोळा थोडक्यात बचावला आहे.
ठाणे : साईनाथनगर परिसरात खेळत असलेल्या नऊवर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मुस्कान अन्वर शेख (९) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला नऊ टाके पडले असून डोळा थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुस्कान अन्वर शेख ही वर्तकनगर येथील साईनाथनगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत असून माजिवडा येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी दुपारी ती घराजवळील परिसरात दोन ते तीन मित्रांसोबत खेळत होती. ती खेळण्यात गुंग असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे मुस्कान खाली पडली आणि त्यानंतर कुत्र्याने तिच्या डोक्याजवळ चावा घेतला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या मुस्कानच्या दोन ते तीन मित्रांनी लगेचच तिथून पळ काढला. त्यामुळे ते कुत्र्यांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
या घटनेनंतर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात मुस्कानला उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तिच्या डोळ्याजवळ जखम असल्यामुळे तिला मुंबईच्या जे.जे. रु ग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या डोळ्याला इजा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डोळ्याजवळील जखमेमुळे तिला अजूनही डोळा उघडता आलेला नाही. मात्र, उपचारानंतर डॉक्टरांनी तिला आता घरी सोडले आहे. भटक्या कुत्र्यांची या परिसरात दहशत असून, महानगरपालिकेने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.