पतंगबाजीत मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:38 AM2021-01-13T02:38:31+5:302021-01-13T02:38:46+5:30
ठाणे, कल्याण-डोंबिवली : पक्षीसंवर्धनासाठी संस्था करतात जागृती
स्नेहा पावसकर
ठाणे : संक्रांतीच्या दिवसात पतंग उडवण्याची परंपरा आहे. या पतंगबाजीमुळे दरवर्षी ठाण्यात काही पक्ष्यांचा जीव जातो. काही पक्षी जखमी होतात, त्यांच्यावर ठाण्यातील प्राणिमित्र संस्था, काही खासगी डॉक्टर उपचार करतात. गेल्या काही वर्षात ठाणे शहरातील पतंगबाजी आणि यातून जखमी होणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे, तर कल्याण-डोंबिवलीत हे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे, मात्र चायनीज मांजा विक्रेत्यांवर जेव्हा पूर्णपणे बंदी येईल तेव्हाच पक्ष्यांना असलेला धोका कमी होऊन त्यांना स्वच्छंदपणे विहार करता येईल.
मकरसंक्रांतीला बिल्डिंगच्या गच्चीवरून, मोकळ्या मैदानातून मुले पतंग उडवतात. शहरी भागात पतंग उडवण्याची क्रेझ काहीशी कमी झाली आहे; मात्र गेल्या काही वर्षात विविध राजकीय पक्ष किंवा काही सामाजिक संस्थांकडूनही पतंग महोत्सवांचे आयोजन केले जायचे. त्यात उत्साहाने अनेकजण सहभागी व्हायचे, मात्र त्यातून पक्ष्यांना इजा होत असे.
मात्र गेल्या एक-दोन वर्षात पतंग उडवण्याचे प्रमाण ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगरसारख्या शहरी भागात खूप कमी झाले आहे. त्याद्वारे जखमी होणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. त्याबरोबर अनेक सामाजिक संस्थांकडून पक्ष्यांचे संवर्धन आणि संरक्षणाबाबत जागृती केली जाते. यंदा कोरोना टाळण्याच्या दृष्टीने पतंगबाजीसाठी न करण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात आले.
मांजामुळे पक्षी मृत्युमुखी
गेल्या वर्षी ठाण्यात या मांजामुळे साधारण १० ते १५ पक्षी जखमी झाले. यात कावळा, कबूतर, घुबड, चिमणी, घार असे पक्षी जखमी होतात, तर कल्याण-डोंबिवलीत गेल्यावर्षी केवळ एकच पक्षी जखमी झालेला आढळला. या पक्ष्यांच्या मानेला किंवा पंखात मांजा अडकल्याने पक्षी जखमी होतात. कधी कधी त्यांच्या जिवावरही बेतते.
चायनिज मांजा विकणाऱ्यांवर
दंडात्मक कडक कारवाई
बाजारात पतंगासोबत मिळणारा मांजा ग्लास कोटेड असतो. असा चायनीज मांजा पक्ष्यांनाच नाही तर माणसांनाही घातक असतो. या चायनीज मांजामुळे व्यक्ती जखमी हाेण्याच्या घटना ठाण्यात फारशा झालेल्या नाहीत, मात्र पक्ष्यांना इजा होते. या ग्लासकोटेड अशा चायनीज मांजांवर बंदी असूनही तो विक्री केला जातो. मकरसंक्रांत एक दिवसावर आली आहे. मात्र बाजारपेठेत पतंग विक्रीसाठी फारशा प्रमाणात अद्याप आलेले नाहीत.
गेल्या काही वर्षात पतंगाबाजीमुळे पक्षी जखमी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ग्लास कोटेड मांजा पक्ष्यांना त्रासदायक ठरतो. त्यांच्या पंखात मांजा अडकला किंवा मानेला लागला तर त्यांच्यावर सावधपणे उपचार करावे लागतात.
- डॉ. सुहास राणे, मानद पशुवैद्य
आमची संस्था पक्ष्यांसाठी काम करते. संक्रांतीदरम्यान जखमी होणाऱ्या पक्ष्यांसाठी आमची हेल्पलाइन नंबर आहे. कल्याण-डोंबिवलीत गेल्यावर्षी एकच जखमी पक्षी आढळला तर त्याच्या आधी दोन वर्ष एकही जखमी पक्षी आढळला नाही.
- नीलेश भणगे, संस्थापक, पॉझ संस्था