कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय; पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 11:20 PM2021-04-28T23:20:36+5:302021-04-28T23:21:05+5:30
पोलीस पाल्यांचा आपल्या वडिलांना भावनिक सल्ला : वर्षभरात ३५ जणांना गमवावा लागला जीव
जितेंद्र कालेकर
ठाणे : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनही अधिक कडक केला आहे. या काळात पोलिसांवरही अधिक ताण वाढला आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना हटविताना ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात तब्बल दोन हजार २६६ पोलीस बाधित झाले, तर ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळेच बाबा बंदोबस्तावर जरूर जा... पण तुमच्याही आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला ठाण्यातील पोलीस पाल्यांनी दिला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी २२ मार्च २०२० पासून ठाणे शहर आणि जिल्हाभर संचारबंदी होती. त्यासाठी राज्य राखीव दलासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. रस्त्यावर विनाकारण फिरणारे, नियम तोडणारे वाहनचालक तसेच मार्केटमध्येही गर्दी करणाऱ्यांना बंदोबस्तावरील पोलिसांना कधी चढा आवाज करीत तर कधी काठीचा धाक दाखवावा लागत होता. त्याचवेळी काही परप्रांतीय मजुरांना कोणतेही वाहन उपलब्ध होत नव्हते.
अशावेळी एक लाखाहून अधिक मजुरांना याच ठाणे पोलिसांनी एसटी आणि रेल्वेच्या मदतीने घरी परतण्यासाठी मोलाची मदत केली होती. आता दुसऱ्या लाटेच्या वेळीही पोलिसांकडून चोख बंदोबस्त राबविला जात आहे. कोरोना योद्धा म्हणून तुम्ही जरुर कर्तव्य पार पाडा; पण त्याचबरोबर तुमची स्वत:चीही काळजी घ्या. आम्ही तुमची वाट पहात आहोत, लवकर घरी या, अशी पोलिसांची मुले त्यांना भावनिक आवाहन करतात.