परदेशात फराळ पाठवणाऱ्यांची संख्या घटली; कोरोना विषाणूचा धसका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 12:19 AM2020-11-11T00:19:19+5:302020-11-11T00:19:29+5:30
दरवर्षी कल्याण-डोंबिवलीतून मोठ्या प्रमाणावर परदेशात फराळ पाठवला जातो.
- कुलदीप घायवट
कल्याण : सातासमुद्रापार राहणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाइकांना आणि कुटुंबातील व्यक्तीला दिवाळीचा फराळ, भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. हे साहित्य पोहोचवण्याचे काम कुरिअर कंपनी, टपाल विभाग करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पार्सलची सेवा सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे यंदाच्या पार्सल सेवेत कमालीची घट झाली आहे.
दरवर्षी कल्याण-डोंबिवलीतून मोठ्या प्रमाणावर परदेशात फराळ पाठवला जातो. परदेशात शिकत असलेल्या किंवा नोकरी करणाऱ्या आप्तेष्टांसाठी कल्याण-डोंबिवलीकर फराळ, भेटवस्तू पाठवत असतात. यंदा कोरोनाचा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी परदेशात पार्सल पाठविले नाही. परदेशात पार्सल पाठविण्याच्या सेवेत टपाल विभागाकडून कोणतीही भाडेवाढ झाली नाही. पण, अनेक कुरिअर कंपन्यांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे पार्सलच्या सेवेत घट झालेली आहे.
टपाल विभागातर्फे ८२ देशांमध्ये फराळ, दिवाळी साहित्य आणि भेटवस्तू पाठविल्या जात आहेत. अमेरिका, कॅनडा, युरोपातील जर्मनी, इटली, फ्रान्स, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड तसेच आशिया खंडातील श्रीलंका, जपान, चीन, इंडोनेशिया आणि आफ्रिका खंडातील काही देशांमध्येही वस्तू पाठविण्यात येतात. मात्र, कल्याण-डोंबिवलीतून अमेरिका आणि यूके या देशात सर्वाधिक फराळ आणि भेटवस्तू पाठविल्या जातात.
टपाल विभागातर्फे एक किलो वजनाप्रमाणे दर आकारून वस्तू किंवा फराळ परदेशात पाठवले जातात. कोरोना काळातही ही सेवा अविरत सुरूच आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्याप्रमाणे इतर सेवा महागल्या, त्याप्रमाणे या काळात कोणत्याही प्रकारचे जादा दर आकारले नसल्याचे टपाल विभागाने सांगितले.