कुटुंबसंख्या पाच लाख ६१ हजार, पाणीबिले मात्र अवघी सव्वादोन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:56+5:302021-02-11T04:41:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेकडून पाणीबिलांच्या वसुलीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार अनधिकृत नळजोडण्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेकडून पाणीबिलांच्या वसुलीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याबरोबर इतर उपायदेखील केले जात आहेत. शहरातील पाच लाख ६० हजार ७०७ कुटुंबांपैकी दोन लाख २३ हजार ४ नळजोडण्या दिलेल्या आहेत. तर आतापर्यंत पाणी बिलापोटी ११५ कोटींची वसुली झालेली असून ६५ कोटींची थकबाकी येणे आहे. यासाठी महापालिकेने मागील दोन वर्षांपासून सुमारे २० हजारांहून अधिक अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या आहेत.
आजघडीला शहराची लोकसंख्या ही २५ लाखांच्या घरात आहे. शहराला रोज ४८८ दशलक्ष पाणीपुरवठा होत आहे. तर शहरात नऊ लाखांहून अधिक झोपड्या असून गृहसंकुलांची संख्यादेखील १० हजारांच्या वर गेली आहे. असे असले तरी आजही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाच लाख ६० हजार ७०७ कुटुंबांना नळजोडण्या दिल्या आहेत. परंतु बिले मात्र दोन लाख २३ हजार चारच दिली जात आहेत. काही ठिकाणी चाळ सिस्टम असल्याने चाळींचे एकत्रित बिल काढले जात आहे. तर गृहसंकुलांच्या ठिकाणीदेखील प्रत्येक इमारतीचे एकच बिल काढले जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळेच बिले लावण्यात येत असल्याची संख्या काहीशी कमी दिसत असल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.
असे असतानाही आजही शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत नळजोडणी घेतली जात आहे. त्यावर महापालिका कारवाईदेखील करते. परंतु त्यांची संख्या मात्र दप्तरी उपलब्ध नाही, किंबहुना त्याचा सर्व्हेदेखील केलेला नाही.
.......
शहराची लोकसंख्या २५ लाख
एकूण कुटुंबे पाच लाख ६० हजार ७०७
अधिकृत नळधारक - दोन लाख २३ हजार ४
चौकट - अनधिकृत नळजोडण्या तोडल्या जात असल्या तरी अधिकृत नळधारकांनीदेखील ६५ कोटींची देणी थकवली आहेत. ती वसूल करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना पुढे आणल्या जात आहेत. तसेच थकीत रकमेवरील व्याजही माफ केले जात आहे. परंतु, असे असले तरी अद्यापही ही वसुली महापालिकेला करता आलेली नाही.
.....
निम्म्या पाण्याची गळती
शहराला रोज ४८८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, आजही पाण्याची चोरी, नियोजनाचा अभाव आणि ठिकठिकाणी असलेल्या पाणीगळतीचे प्रमाण यामुळे शहरात ४५ टक्के पाणीगळती आहे.
अनधिकृत नळधारकांवर कारवाई
ठाणे महापालिका दरवर्षी अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करते. त्यानुसार या आर्थिक वर्षात आतापर्यंत अडीच हजारच्या आसपास अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या आहेत. तर मागील दोन वर्षांत २० हजारांहून अधिक नळजोडण्या खंडित केल्या आहेत.
....
थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू आहे. ज्यांची अधिकची थकबाकी असेल त्यांचे कनेक्शन खंडित केले जात आहे. याशिवाय पाणीगळती रोखण्यासाठीदेखील विविध स्वरूपाचे उपाय केले जात आहेत.
(विनोद पवार - कार्यकारी अभियंता - पाणीपुरवठा विभाग, ठामपा)