ठाणे जिल्ह्यातील एचआयव्ही रुग्णांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:35 AM2018-12-02T01:35:31+5:302018-12-02T01:37:47+5:30
ठाणे जिल्ह्यात एचआयव्हीबाधित रुग्ण, गर्भवतींची संख्या घटल्याचा दावा ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालय आणि आरोग्य विभागाने केला आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात एचआयव्हीबाधित रुग्ण, गर्भवतींची संख्या घटल्याचा दावा ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालय आणि आरोग्य विभागाने केला आहे. सामान्य (स्त्री-पुरुष) रुग्णांच्या तपासणीत यंदा हे प्रमाण ०.९० टक्क्यांवर, तर गर्भवती रुग्णांचे प्रमाण ०.०६ टक्क्यांवर आले आहे. एड्स प्रतिबंधात्मक जिल्हा आरोग्य विभागामार्फत राबवलेल्या जनजागृतीचे हे फलित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२००७ ते आॅक्टोबर २०१८ या वर्षात जिल्ह्यात ३४ हजार ६२४ एचआयव्हीबाधित रुग्णांची नोंद आहे. २१ हजार ४१९ बाधितांवर एआरटी केंद्रात औषधोपचार सुरू आहेत. या कालावधीत तीन हजार ५९८ स्त्री-पुरुषांचा तर १२५ बालकांचा मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारीत दिसत आहे.
‘आपली एचआयव्हीची स्थिती माहिती आहे का?’ असे यंदाच्या जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य आहे. तसेच ‘मोफत तपासणी व मोफत उपचार’ यावर यंदा लक्ष केंद्रित केले आहे. वि.सा. सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा एड्स कार्यक्रम नियंत्रण विभागांतर्गत येणाऱ्या आयसीटीसी केंद्रात एप्रिल २०१० ते आॅक्टोबर २०१९ दरम्यान १४ लाख ९१ हजार ११५ जणांच्या चाचणीत २८ हजार २४३ जण एचआयव्हीबाधित रुग्ण आढळले आहेत.
२०१७-१८ मध्ये दोन हजार १७९ बाधित रुग्ण आढळून आले. तर, यंदा एक हजार २१५ रुग्ण आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१० ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान नऊ लाख ३२ हजार ८६८ गर्भवतींची चाचणी केली आहे. त्यामध्ये एक हजार ४६५ गर्भवती बाधित असल्याचे समोर आले आहे. तर, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान एक लाख १३ हजार ३० गर्भवतींची तपासणी केली होती. त्यात ११७ जणी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले होते. एप्रिल २०१८ ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान ६८ हजार ८३६ गर्भवतींची तपासणी केली होती. त्यामध्ये ४५ माता पॉझिटिव्ह आढळून आल्या.
>पंधरा दिवस जनजागृती
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान विविध स्तरांवर जगजागृती करण्यात येत आहे. यामध्ये प्रभातफेरीसह चित्रकला, पथनाट्य आदी स्पर्धा होणार आहेत.
अतिजोखीम असणारे गट व सर्वसामान्य लोकांपर्यंत विविध संस्था, संघटना व सरकारी यंत्रणेमार्फत राबवल्या जाणाºया जनजागृतीमुळे एचआयव्हीचा प्रसार जिल्ह्यात रोखण्यास यश आले आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे