दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये विवाह नोंदणीची संख्या घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:04+5:302021-04-23T04:43:04+5:30
ठाणे : पहिल्या लॉकडाऊनमध्ये नियोजित विवाह सोहळे रद्द झाल्यानंतर उपवर वर-वधू हे नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे वळले होते. त्यामुळे ...
ठाणे : पहिल्या लॉकडाऊनमध्ये नियोजित विवाह सोहळे रद्द झाल्यानंतर उपवर वर-वधू हे नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे वळले होते. त्यामुळे असे विवाह करणाऱ्यांची संख्या दिवसाला ३५ ते ४० च्या आसपास गेली होती. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मात्र उलट परिस्थिती पाहायला मिळत असून ही संख्या कमी झाल्याचे निरीक्षण जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने नोंदविले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाले आणि एप्रिल, मे महिन्यात ठरविलेले विवाह सोहळे अनेकांना रद्द करून पुढे ढकलावे लागले. अशांनी नंतर नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला पसंती दिल्याने ही संख्या वाढत गेली. लॉकडाऊन आधी दिवसाला कधी ५, कधी १० तर एखादा अनोखा मुहूर्त असेल तर अगदी २०-२२ विवाह सोहळे पार पाडत. परंतु, लॉकडाऊनमुळे ही संख्या दुपटी-तिपटीने वाढू लागली. परंतु, या लॉकडाऊनमध्ये उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालयातील नियोजित विवाह सोहळे तर रद्द झालेच परंतु, कोरोनाच्या धास्तीने नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्यादेखील घटली, असे विवाह अधिकारी अनिल यादव यांनी सांगितले. या लॉकडाऊनमध्ये आता ही संख्या अर्ध्यावर आली असून १०-१५-२० अशा संख्येने विवाह सोहळे होत आहेत.
---------------
राज्य सरकारने २२ एप्रिलपासून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात केवळ १५ टक्के उपस्थिती असेल. कार्यालय सुरू असले तरी विवाहासाठी जोडपी येतील की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
----------------