बोईसरात असंख्य प्रवासी निवाऱ्यांची अवस्था भयावह
By admin | Published: January 5, 2017 05:32 AM2017-01-05T05:32:26+5:302017-01-05T05:32:26+5:30
बोईसर परिसरातील असंख्य एसटीच्या प्रवासी निवाऱ्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. हे प्रवासी निवारे की गुरांचे गोठे की गर्दुल्यांचे अड्डे? असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात
पंकज राऊत, बोईसर
बोईसर परिसरातील असंख्य एसटीच्या प्रवासी निवाऱ्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. हे प्रवासी निवारे की गुरांचे गोठे की गर्दुल्यांचे अड्डे? असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात असून त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाकडे एसटी महामंडळाकडून अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे
प्रवाशांना एसटीची प्रतिक्षा करतांना उन्हातान्हात निवारा मिळावा म्हणून काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात ज्या ठिकाणी एसटीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्या मुख्य रस्त्यालागत मोठे निवारे बांधण्यात आले. मात्र, त्या निवाऱ्यापैकी काही निवाऱ्यांचे पत्रे फुटून अर्धे अधिक छप्परच गायब झाले आहेत. काही निवारे आतून २ ते ३ फूटा पर्यंत खोल खचून अक्षरश:मोठे खड्डे पडले आहेत. भिंतीनाही मोठमोठे तडे जाऊंन त्या कुठल्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी ने बांधलेल्या निवाऱ्यांपैकी काही निवारे हे गर्दुल्यांचे अड्डे तर काही सिनेमाच्या जाहिराती व खाजगी होर्डिंग लावण्यासाठी वापरले जात आहेत. तर काही निवाऱ्यांत गुराढोरांचे वास्तव्य असल्याने व त्यांच्या मलमूत्रा बरोबरच कचरा व सांडपाणी साचून रस्त्यावरही त्याची दुर्गंधी पसरली आहे.
बोईसर-तारापुर रस्त्यावरील भीमनगर येथील प्रवासी निवाऱ्याला लागूनच बोईसर ग्रामपंचायतीने मोठी कचराकुंडी बांधल्याने तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साचतो.
त्यामध्ये असलेली फळे, भाज्यांचे अवशेष खाण्याकरीता गुराढोरांचा सतत वावर असतो. त्यांच्यातील होणाऱ्या झोंबीमुळे प्रवासी भयभीत होतात. काहीवेळा तो कचरा अस्ताव्यस्त पसरतो, तर कधी पेटविण्यात आल्याने त्याच्या धूराने निवाऱ्या जवळही उभे राहणे प्रवाशांना शक्य होत नाही.