कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांची संख्या पोहोचली ८०४ वर; सर्वाधिक बाधित टिटवाळ्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:53 AM2020-05-26T00:53:42+5:302020-05-26T00:53:54+5:30
नवीन ३८ रुग्णांमधील १२ जण टिटवाळा परिसरातील असून, त्यात सहा वर्षांची मुलगी, नऊ व १४ वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे.
कल्याण : केडीएमसीत कोरोनामुळे सोमवारी चौघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २२ झाली. तर, नवीन ३८ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ८०४ झाली आहे. पूर्वेतील जरीमरी मंदिराजवळ राहणारा ५५ वर्षांचा पुरुष, नांदिवलीतील ५९ वर्षांचा पुरुष तसेच वाशी एपीएसमीत लेखापाल असलेल्या ६९ वर्षांचा पुरुष आणि पश्चिमेतील ८३ वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवीन ३८ रुग्णांमधील १२ जण टिटवाळा परिसरातील असून, त्यात सहा वर्षांची मुलगी, नऊ व १४ वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. आंबिवलीत पाच, कल्याण पूर्वेत एक, पश्चिमेत तीन, डोंबिवली पूर्वेत एक, पश्चिमेत सात रुग्ण आढळले आहेत. ३८ जणांमध्ये १९ महिला आहेत. दुसरीकडे उपचाराअंती घरी गेलेल्यांची संख्या २७२ आहे. तर, उपचार घेणाऱ्यांची संख्या ५१० आहे.
बदलापुरात वृद्धेचा, अंबरनाथमध्ये तरुणाचा मृत्यू
अंबरनाथ/बदलापूर : बदलापूर नगरपालिका हद्दीत सोमवारी एका ८५ वर्षांच्या महिलेचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या सात झाली आहे. तर, दिवसभरात १३ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १७४ वर गेली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले आहे. दुसरीकडे, अंबरनाथमध्ये कोरोनाचा दुसरा मृत्यू झाला आहे. हा तरुण पाच दिवसांपासून कोरोनामुळे त्रस्त होता. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची कोरोना टेस्ट मृत्यू झाल्यानंतर पॉझिटिव्ह आली आहे. आज दिवसभरात कोरोनाग्रस्तांसोबत इतर तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अंबरनाथमधील कोरोना रुग्णांचा आकडा ६६ वर पोहोचला आहे.
क्वारंटाइन ठेवलेल्यांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
विक्रमगड : तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कातील पाच जण आणि इतर जिल्ह्यांतून आलेल्या एकूण १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. बाजारपेठ सुरू केली असून नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अशा सूचना तहसीलदार श्रीधर गालिपेल्ली यांनी केली आहे.
पोलीस कॉलनी केली प्रतिबंधित
बोईसर : तारापूर पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलीस कॉलनीत राहणाºया व वसई महापालिकेत पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण पोलीस कॉलनी १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आली आहे. तर, या रुग्णाच्या संपर्कातील १० जणांना पालघर येथे विलगीकरणात ठेवले आहे.