पटसंख्या वाढली विद्यार्थी बसणार कुठे?
By admin | Published: September 5, 2015 10:22 PM2015-09-05T22:22:12+5:302015-09-05T22:22:12+5:30
एकीकडे सोयीसुविधांच्या अभावात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला घरघर लागली असताना व दुसरीकडे शाळेचा पट वाढत असतानाही जागेअभावी विद्यार्थी बसवायचे तरी कुठे, अशी समस्या उभी राहिली आहे.
- प्रशांत माने, कल्याण
एकीकडे सोयीसुविधांच्या अभावात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला घरघर लागली असताना व दुसरीकडे शाळेचा पट वाढत असतानाही जागेअभावी विद्यार्थी बसवायचे तरी कुठे, अशी समस्या उभी राहिली आहे. टिटवाळ्या नजीकच्या उंभार्णी परिसरातील सोनुभाऊ बसवंत प्राथमिक विद्यालयात. ही मराठी माध्यमाची शाळा आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग या ठिकाणी आहेत. या शाळेत बालवाडी नाही. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ती भरते. सध्या तिची पटसंख्या ६८ इतकी असून मागील वर्षी ती ४७ होती. या शाळेला एकच खोली असून सर्व इयत्तांचे वर्ग एकत्रित भरविले जात आहेत. इयत्तांचा आढावा घेता पहिलीत १८, दुसरीत १३, तिसरीमध्ये ८, चौथीत ११ आणि पाचवीत १८ असे विद्यार्थी आहेत. जागेअभावी विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होत असून बसायला बेंचेस अपुरे पडत आहेत. त्यामुळे काहींना जमिनीवर बसावे लागत आहे. या ठिकाणी शिकणारी ८० टकके मुले ही आदिवासी समाजातील आहेत. वह्या, पाठ्यपुस्तके, रेनकोट, कंपासपेटी, दप्तरे आदी शैक्षणिक सामुग्री त्यांना मिळाली आहे. परंतु, अद्याप गणवेश मिळालेला नाही. शाळेत एक संगणक आहे, तो ही स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी शाळेचे नूतनीकरण त्यांच्याच निधीतून झाले आहे. शालेय पोषण आहार नियमितपणे मिळत आहे. प्रसाधनगृहाची सुविधादेखील असून वर्गात वीज, पंखा तसेच फळा आदी सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी दोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही.