कासकरच्या ‘सीडीआर’मध्ये मिळाले संशयास्पद नंबर, दुबईत जास्त कॉल्स जात असल्याचे स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 05:24 AM2017-10-07T05:24:42+5:302017-10-07T05:25:03+5:30
खंडणी प्रकरणामध्ये अटक केलेल्या इक्बाल कासकरच्या कॉल डिटेल्समधून काही संशयास्पद नंबर पोलिसांना मिळाले आहेत. वेळोवेळी कासकरच्या संपर्कात असलेले काही मोबाइल नंबर्स पोलिसांनी नोंद केले आहेत.
ठाणे : खंडणी प्रकरणामध्ये अटक केलेल्या इक्बाल कासकरच्या कॉल डिटेल्समधून काही संशयास्पद नंबर पोलिसांना मिळाले आहेत. वेळोवेळी कासकरच्या संपर्कात असलेले काही मोबाइल नंबर्स पोलिसांनी नोंद केले आहेत. कासकरचे दुबई येथे जास्त कॉल्स जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने १९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध ठाण्यात खंडणीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्याच्या मोबाइल फोनचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) संबंधित कंपनीकडून मागवला होता. त्यानुसार, काही मोबाइल नंबर्सवरून कासकरला वेळोवेळी फोन आल्याचे स्पष्ट झाले आहे. हे मोबाइल नंबर कुणाचे आहेत, त्यांचा कासकरशी काय संबंध, याची चौकशी पोलीस करत आहेत. त्याने पाकिस्तानमध्ये फोन केल्याचे मात्र ‘सीडीआर’मध्ये दिसले नाही. दाऊद, अनिस इब्राहिम किंवा छोटा शकीलच्या संपर्कात राहण्यासाठी त्याने ‘व्हीओआयपी’ (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) तंत्रज्ञानाचा वापर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली. इक्बाल कासकरसह या सर्व आरोपींच्या पासपोर्टची पडताळणी सुरू केली आहे. पासपोर्टवर स्टॅम्पिंग न करता दाऊदची पत्नी मेहजबीन खान मुंबईत येऊन गेल्याची माहिती पोलिसांना इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान मिळाली होती. त्याच पद्धतीने कासकरही पाकिस्तानला जाऊन आला असावा, असा पोलिसांना संशय आहे.