स्वाइन रुग्णांची संख्या २०० पार
By admin | Published: July 2, 2017 06:07 AM2017-07-02T06:07:38+5:302017-07-02T06:07:38+5:30
जिल्ह्यात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा २११ वर गेला आहे. त्यामधील अजूनही ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा २११ वर गेला आहे. त्यामधील अजूनही ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर येथे ९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, १०१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांचीही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जून महिन्यात स्वाइन फ्लूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला असून लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २११ झाली आहे. त्यातच १ जुलै रोजी २९ रुग्ण वाढले असून त्यामध्ये ठाण्यात ११ आणि कल्याण आणि मीरा-भार्इंदर तसेच नवी मुंबईतील आहेत. तर, दगावलेल्या एकूण १३ रुग्णांमध्ये ९ रुग्ण हे ठाण्यात दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरात डेंग्यू-मलेरिया वाढला
स्वाइन फ्लूपाठोपाठ ठाणे महापालिका हद्दीत डेंग्यूचे तब्बल १०७ तर मलेरियाचे ३६८ रु ग्ण आढळल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली. याचदरम्यान आतापर्यंत मलेरियाच्या ४० हजार रक्ततपासण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे लेप्टोचा एक रुग्ण आढळून आला असून त्याचाही मृत्यू झाला आहे. तसेच कावीळचे सात, टायफॉइडचे सहा रुग्ण आढळले आहेत.
या वाढत्या साथीच्या आजाराने आरोग्य विभागाने आता १७८ प्रस्ताविकांची नेमणूक केली असून ते घरोघरी जाऊन याबाबत तपासण्या करीत आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक काळ पाणी साठवून ठेवू नये, आपले घर आणि आपल्या परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. त्याचप्रमाणे जनजागृतीही सुरू करण्यात आली आहे.