दुचाकीला वापरला ट्रकचा क्रमांक, जमील शेख हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:34 AM2020-11-26T01:34:09+5:302020-11-26T01:34:45+5:30
उत्तर प्रदेश एसटीएफचीही घेणार मदत : जमील शेख हत्याकांड
जितेंद्र कालेकर
ठाणे : मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येसाठी वापरलेल्या दुचाकीसाठी ठाणे जिल्ह्यातील एका ट्रकचा क्रमांक वापरल्याची माहिती समोर आली आहे. मारेकरी उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये पळाल्याची शक्यता गृहीत धरून त्यासाठी गरज पडली तर यूपीच्या स्पेशल टास्क फोर्सचीही (एसटीएफ) मदत घेतली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने अगदी दिवसाढवळ्या सहजतेने जमील यांच्यावर गोळ्या झाडून पलायनही केले. त्यावरून स्थानिक कोणीतरी हल्लेखोरांना इत्थंभूत माहिती दिल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणाचा राबोडी पोलिसांबरोबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही समांतर तपास सुरू आहे. त्यासाठी पाच पथकांची निर्मिती केली आहे. एका सीसीटीव्हीच्या चित्रणानुसार हल्लेखोरांनी राबोडीतून बाहेर पडताना केव्हीला मार्गाने जिल्हा मध्यवर्ती कारागृह त्यानंतर कळवा ब्रिजच्या दिशेने पलायन केले. बुधवारी दिवसभरात सात ते आठ संशयितांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी चौकशी केली. मात्र, यातून ठोस माहिती मिळाली नाही.
दरम्यान, जमील यांचे पार्थिव बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी आणले. आरोपी कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे आश्वासन पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिल्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात दफनविधी पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते तसेच राबोडीतील रहिवासी उपस्थित होते. अनेकांनी त्यांच्या उजव्या खांद्याला निषेधाची कापडी पट्टी बांधली होती.