कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांत स्त्रियांची संख्या जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:28 AM2021-02-11T00:28:27+5:302021-02-11T00:28:35+5:30
आधुनिक काळात छोट्या कुटुंबांकडे कल : अनेक गैरसमजांमुळे पुरुषांचे मात्र प्रमाण कमी
- हितेन नाईक
पालघर : भारतातील लोकसंख्येचा विचार केल्यास लोकसंख्यास्फोट, वाढती महागाई आणि मर्यादित साधनसामग्री यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू नाहीशी होत असून विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येत आहे. त्यामुळे कुटुंबात एक किंवा जास्तीत जास्त दोन अपत्ये असावीत असा कल दाम्पत्यांचा राहिलेला आहे. दरम्यान, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसाठी स्त्रियांनाच पुढे केले जात असल्याचे दिसून येत असून या अनेक गैरसमजांमुळे या शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांचे प्रमाण मात्र कमी असल्याचे आढळून आले आहे.
डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संतती नियमन केल्याने अकारण गर्भपाताची वेळ उद्भवत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात मूल जन्माला घालण्याबाबत दाम्पत्यांना कुटुंबनियोजनाचा सल्ला आणि साधने उपलब्ध करून दिली जातात. जोडप्यांमध्ये सुरक्षित शरीर संबंध, पत्नीवर मातृत्व न लादणे आणि लैंगिक रोगापासून बचाव ही कुटुंब नियोजनाची त्रिसूत्री आहे. कुटुंब नियोजनात पुरुषाच्या शुक्रवाहिन्या नलिका कट कराव्या लागत असल्याने अशा शस्त्रक्रियेसाठी पुरुषवर्ग तयार होत नाही. उलट त्यासाठी महिलांना पुढे केले जाऊन त्यांच्यावर लॅप्रोस्कोपीने शस्त्रक्रिया अथवा गर्भाशयाच्या मुखाजवळ डायफ्रेम बसविली जाते.
गेल्या वर्षात कुटुंब नियोजनासाठी पालघरमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत मार्च २०१९ पर्यंत आर ३ गटात ६१०३ चे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यातील ६०२७ (९९ टक्के)उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर आर ५ गटात मिळून (खासगी हॉस्पिटल मिळून) ७९३८ म्हणजे १३० टक्के काम झाले आहे. तर मार्च २०२० पर्यंत आर ३ गटात ६१०३ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील ५४४७ (८९ टक्के) उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर आर ५ गटात मिळून (खासगी हॉस्पिटल मिळून) ७९३९ म्हणजे १३० टक्के काम झाले आहे.
पुरुषांसाठी सोपी उपाययोजना, तरीही गैरसमज
कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया मोहिमेअंतर्गत महिलांच्या संतती नियमन शस्त्रक्रियेपेक्षा पुरुषांसाठी अगदी सहज, सोपी उपाययोजना केली जात असून त्यांच्यावर स्कालपेन नेस (कुठलेही शस्त्र न लावता) शस्त्रक्रिया केली जात असल्याचे शासकीय रुग्णालयात मागील २९ वर्षांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी लोकमतला सांगितले, परंतु आपली सेक्सपॉवर कमी होईल, अंडाशय काढली जातील, लिंगातील ताठरपणा कमी होईल का? अशा गैरसमजुतीमुळे पुरुष संतती नियमन करण्यास पुढे येत नाहीत.
कुटुंब नियोजन मोहिमेअंतर्गत महिलांच्या संतती नियमन शस्त्रक्रियेपेक्षा पुरुषांसाठी अगदी सहज, सोपी उपाययोजना केली जाते. त्यांच्यावर कुठलेही शस्त्र न लावता शस्त्रक्रिया केली जात असते. मात्र तरीही पुरुषांचा प्रतिसाद खूपच कमी आहे.
- डॉ. राजेंद्र चव्हाण
महिला होताहेत सजग
कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया मोहिमेअंतर्गत जनजागृती केली जात असते. यातून महिला सजग होत असून एक किंवा दोन मुलांवर समाधान मानण्याकडे महिलांचा कल वाढला आहे.