नूपुर शर्माला पायधुनी पोलिसांचे समन्स; २५ जूनला ठाण्यात हजर राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:50 AM2022-06-13T05:50:17+5:302022-06-13T05:50:40+5:30
वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलेल्या नेत्या नूपुर शर्माची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत.
मुंबई :
वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलेल्या नेत्या नूपुर शर्माची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. तिला पायधुनी पोलिसांनी समन्स बजावत २५ जूनला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे.
शर्माला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले होते. त्यानुसार पायधुनी पोलिसांनी तिला समन्स पाठवले आहेत. वृत्तवहिनीवर चर्चेदरम्यान केलेल्या टिप्पण्यांसंदर्भात तिचा जबाब नोंदविला जाणार आहे, असे पांडे यांनी सांगितले होते. शर्माविरोधात गेल्या आठवड्यात पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रझा अकादमीच्या मुंबई शाखेचे सहसचिव इरफान शेख यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे पायधुनी पोलिसांनी धार्मिक भावना दुखावणे, शत्रुत्वाला चालना देणे आणि सार्वजनिक क्षोभ निर्माण केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविला. तिच्यावर कलम २९५-अ (कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना भडकवण्याच्या हेतूने केलेली कृत्ये), १५३-अ (धर्माच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि ५०५ (२) (सार्वजनिक गैरव्यवहारास कारणीभूत विधाने) ही कलमे लावण्यात आली आहेत.