भातसा नदीला आलेल्या पुरात रोपवाटिका गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:54 AM2019-08-07T00:54:21+5:302019-08-07T00:54:32+5:30
महिला उद्योजिकांचे नुकसान; क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते
आसनगाव : मागील आठदिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच शनिवारी भातसा धरणाचे पाच दरवाजे २ मीटरने उघडल्याने भातसा नदीने रौद्ररूप धारण केले होते. शहापूरला जोडणारा भातसा नदीवरील सापगाव पूल सात फुटांपेक्षा जास्त पाण्याखाली गेला होता. या पुरात सापगाव पुलाजवळ असलेली रोपवाटिका वाहून गेली. यात शेतकरी, महिला उद्योजिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
शहापूर तालुक्यातील शेतकरी विद्या फर्डे व समृद्धी चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीत उद्योजिका होण्याचे स्वप्न उराशी बाळगून भातसा नदीच्या पात्राजवळ सापगाव शिवमंदिराच्या शेजारी भाड्याने जागा घेऊन कुटुंबाच्या, नातेवाईकांच्या आणि हितचिंतकांच्या मदतीने सहा महिन्यांपूर्वी रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केला. या रोपवाटिकेत रत्नागिरी येथील उत्तम दर्जाची देवगड हापूस, केशर, रत्ना, सिंधू, तोतापुरी, लंगडा अशी हजारो आंब्यांची कलमे याचबरोबर चिकू, नारळ, पेरू, काजू अशी अनेक विविध प्रकारची फळझाडे तसेच सोनचाफा, गुलाब, अनेक शोभीवंत फुलझाडे विक्रीसाठी उपलब्ध होती.
रोपवाटिका शहापूर- किन्हवली- डोळखांब- मुरबाड या मुख्य रस्त्यावर आहे. शनिवारी सायंकाळी भातसा नदीच्या महापुरात क्षणात होत्याचे नव्हते झाले. रोपवाटिकेच्या नदीपात्राच्या बाजूला असलेली दगड, विटा सिमेंटची संरक्षक भिंत पाण्याच्या वेगवान प्रवाहाने खचली. पुराच्या पाण्यात एकही झाड शिल्लक न राहता सर्वच्यासर्व झाडे वाहून गेली. दरम्यान, रोपवाटिकेतील मजूर व त्यांची मुले यांना व्यवस्थापक समीर चौधरी यांनी सुरक्षितस्थळी हलवले.