वेतनासाठी ग्लोबलमध्ये परिचारिकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:45 AM2021-05-25T04:45:46+5:302021-05-25T04:45:46+5:30
ठाणे : जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची सेवा बजावत असतानाही वेतन थकल्यामुळे अखेर ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील परिचारिकांच्या ...
ठाणे : जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची सेवा बजावत असतानाही वेतन थकल्यामुळे अखेर ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील परिचारिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदाराने वेतन थकवल्याने सुमारे अडीचशे परिचारिकांनी सोमवारी आंदोलनाचे हत्यार उपसून निदर्शने केली. तसेच नियमित वेतन न मिळाल्यास काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही यावेळी दिला.
येथील कर्मचारी पुरवण्याचे काम ओम साई आरोग्य सेवा या खासगी ठेकेदाराला दिले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिका या ठेकेदाराला अदा करते. मात्र, हे कोविड सेंटर उभारल्या पासून येथील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याची बाब उघडीस आली आहे. या रुग्णालयात सुमारे अडीचशे परिचारिका ३० ते ४० हजार वेतनावर काम करत असून त्यांना महिन्याच्या सात तारखेपर्यंत पगार देण्याची हमी ठेकेदाराने दिली होती. पण गेल्या वर्षभरात कोणत्याच महिन्यात याची पूर्तता झाली नाही. अशातच गेल्या दोन महिन्यांपासून या परिचारिकांचे वेतन थकवण्यात आले आहे. ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सोमवारी रुग्णालय आवारातच या परिचारिकांनी आंदोलन केले.
....
ठेकेदाराला वेतनाचे पैसे महापालिकेने अदा केले आहेत. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याचे आदेश दिल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.