केडीएमसीत नर्सचे ठिय्या आंदोलन;पगारवाढीच्या लेखी हमीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:19 AM2020-07-01T01:19:13+5:302020-07-01T01:19:20+5:30
एनयूएचएममधील १९२ नर्स कल्याण-डोंबिवलीत २०१५ पासून कार्यरत आहे. दर महिन्याला त्यांना आठ हजार ६४० रुपये पगार दिला जातो.
कल्याण : ‘नॅशनल अर्बन हेल्थ मिशन’(एनयूएचएम) मधील १९२ नर्सनी किमान वेतन दिले जात नसल्याने मंगळवारपासून केडीएमसी मुख्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पगारवाढीचे लेखी आश्वासन द्या; अन्यथा कामावर हजर होणार नाही, असा इशारा या नर्सनी दिला आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी आंदोलन मागे घेतलेले नव्हते.
एनयूएचएममधील १९२ नर्स कल्याण-डोंबिवलीत २०१५ पासून कार्यरत आहे. दर महिन्याला त्यांना आठ हजार ६४० रुपये पगार दिला जातो. अन्य महापालिकांमध्ये हेच काम करणाऱ्यांना किमान वेतन, वैद्यकीय भत्ते तर, सध्या कोविड भत्ता दिला जात आहे. मात्र, केडीएमसीतील या नर्सना किमान वेतन, सुरक्षेची साधने व कोविड भत्ताही दिला जात नाही. सध्या या नर्स वैद्यकीय सेवा देत आहेत. साप्ताहिक सुटीही त्यांना घेऊ दिली जात नाही. याप्रकरणी दाद मागण्यासाठी त्यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली होती. रात्री ८ वाजेपर्यंत त्यांची आयुक्तांशी भेट न झाल्याने त्या पुन्हा मंगळवारी महापालिका मुख्यालयात आल्या. मात्र, महापालिकेकडून लेखी आश्वासन न मिळाल्याने त्यांनी ठिय्या धरला.
दरम्यान, राष्ट्रीय अभियान संचालनालयाचे आयुक्त अनुप कुमार यादवी यांच्या सहीची एक नोटीस त्यांना दिली गेली आहे. कोविड साथ काळात अभियानांर्गत काम करणाºया वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहणे आवश्यक आहे. ४८ तासांत हे कर्मचारी हजर न झाल्यास त्यांच्याविरोधात कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. मात्र, ही नोटीस १४ मे २०२० ला काढलेली आहे. त्याच नोटिशीच्या आधारे कारवाईची तंबी महापालिका देण्याच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप नोटीस काढलेली नाही.
आयुक्तांशी केली चर्चा
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आंदोलनकर्त्या नर्सची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, याविषयी आयुक्तांशी चर्चा केली आहे. कोविडप्रमाणे त्यांना वेतन देण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. त्याची लेखी आॅर्डर काढली जाईल, असे त्यांनी आश्वासित केले आहे.
किमान वेतन देण्याचा विचार करणार
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, यासंदर्भात बैठक घेतली आहे. कोविड काळात त्यांना अन्य नर्सेसच्या तुलनेत मानधन वाढवून देण्यात येईल; तसेच त्यांना किमान वेतन देण्याचा विचार केला जाईल.