मतदारयादीवरील हरकती संपल्या, तरी निवडणुकीबाबत अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:28 PM2021-02-22T23:28:56+5:302021-02-22T23:29:06+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्रारूप मतदारयादीवरील हरकत घेण्याची ...
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्रारूप मतदारयादीवरील हरकत घेण्याची मुदत सोमवारी संपली असली तरी निवडणुकीबाबत अनिश्चितता कायम राहिली आहे. कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढत असल्याने नेमक्या निवडणुका होणार कधी हे स्पष्ट झालेले नाही.
अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रारूप मतदारयादीवर हरकत घेण्याची २२ फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती. सोमवारी हरकतीच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी हरकतींसाठी लांबच लांब रांग लावली होती. शेकडोंच्या संख्येने हरकती आल्या असून, मतदारयादीत प्रचंड प्रमाणात घोळ असल्याचे समोर आले आहे. प्रभागनिहाय यादी तयार करताना अनेक मतदार हे वाॅर्डाच्या बाहेर फेकले गेल्याचेही समोर आले आहे.
मतदारयादीवरील हरकती संपल्यावर आता त्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. हे सर्व सुरू असतानाच आता निवडणुका पुढे जाणार, अशी चर्चादेखील सुरू झाली आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनची चर्चा रंगत आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. राज्य शासन निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार यावरच अंबरनाथ आणि बदलापूरच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
मतदारयादीचे काम सुरू असतानाच निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे पालिकेची निवडणूक मार्च महिन्याच्या शेवटच्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता होती. मात्र, कोरोनाचे संकट पाहता या निवडणुकीबाबत शासन निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.