उल्हासनगर महापालिका उद्यानातील एलईडी टीव्हीवर लावला अश्लिल चित्रपट
By सदानंद नाईक | Published: January 27, 2024 05:31 PM2024-01-27T17:31:56+5:302024-01-27T17:32:12+5:30
पोलिसात तक्रार अल्पवयीन मुलाचे कृत्य
उल्हासनगर : महापालिकेने पर्यावरण विषयक माहिती देण्यासाठी सपना गार्डन येथील एलईडी टीव्ही क्रिनवर २३ जानेवारी रोजी रात्री चक्क ब्ल्यू फिल्म सुरू झाल्याने, एकच खळबळ उडाली. स्थानिक नगरसेवक मनोज लासी यांना जागृत नागरिकांनी माहिती दिल्यावर, लासी यांनी महापालिका अधिकाऱ्याला माहिती देताच एलईडी टीव्ही बंद करण्यात आली.
उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना पर्यावरण बाबत माहिती देण्यासाठी शहरातील सपना गार्डनसह एकून ८ ठिकाणी एलईडी क्रिन टीव्ही लावण्यात आले आहे. सपना गार्डन येथील एलईडी टीव्हीवर २३ जानेवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान ब्ल्यू फिल्म सुरू झाली. अश्लील फिल्म सुरू होताच महिला व मुलींनी येथून काढता पाय घेतला. तर नागरिकांनी संताप व्यक्त केला. एका जागृत नागरिकांनी स्थानिक नगरसेवक मनोज लासी यांना हा प्रकार सांगितल्यावर, त्यांनाही धक्का बसला. त्यांनी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देताच, सपना गार्डन येथील एलईडी टीव्ही क्रिन बंद केली. त्यामुळे नागरिकांत निर्माण झालेला संताप थांबला.
महापालिका उपायुक्त डॉ सुभाष जाधव व पर्यावरण विभागाच्या प्रमुख विशाखा सावंत यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविले असता, एका अल्पवयीन मुलाने एलईडी टीव्हीला छेडछाड करून ब्ल्यू फिल्म सुरू केल्याचे उघड झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. या प्रकारानंतर महापालिकेने एकून ८ ठिकाणी लावलेले एलईडी टीव्हीचे प्रक्षेपण थांबविले आहे.
पालकांनो मुलांना सांभाळा... अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर
पालक कोणतीही काळजी न घेता मुलांच्या हातात मोबाईल देत असल्याने, मुलांना वेगळाच छंद लागण्याची भीती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी महापालिका गार्डन येथील एलईडी टीव्ही क्रिनवर लागलेल्या ब्ल्यू फिल्म प्रकारानंतर व्यक्त केली. मुलांच्या हातात मोबाईल दिल्यावर मुले त्याचा वापर कशा करतात. याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. नाहीतर असे प्रकार घडत राहणार आहेत.