२१ हजारांसाठी ८५ वर्षांच्या वृद्धाची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:57 PM2020-06-09T23:57:38+5:302020-06-09T23:57:47+5:30

आयुक्तांकडे तक्रार : महापालिकेने रुग्णालयासाठी दिलेला भूखंड परत घेण्याची मागणी

Obstacle of 85 year old for 21 thousand | २१ हजारांसाठी ८५ वर्षांच्या वृद्धाची अडवणूक

२१ हजारांसाठी ८५ वर्षांच्या वृद्धाची अडवणूक

Next

ठाणे : महापालिकेने भूखंड दिलेल्या पाचपाखाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये वृद्धाला बिलाचे २१ हजार रुपये न भरल्यामुळे रात्रभर रखडवून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. कुटुंबीयांनी नातेवाइकांकडून पैसे आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयातून त्यांना सोडले. या प्रकरणाची भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे तक्रार करून भूखंड परत घेण्याची मागणी केली आहे.

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्यावर ट्रस्टच्या कोट्यातून या रुग्णालयात उपचार सुरू होते. ५ जून रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देणार असून बिल ६४ हजार रुपये झाले. मात्र, ट्रस्टच्या कोट्यामुळे २१ हजार रुपये भरावेत, असे सांगून त्याशिवाय घरी जाता येणार असल्याचे फर्मान व्यवस्थापनाने दिले. त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे रात्रभर बसवून ठेवले. इतकेच नव्हेतर, रात्रीचे जेवणही न देता भुकेल्यापोटी ठेवले. नातेवाइकांनी धावपळ करून पैसे भरल्यानंतरच वृद्धाला सोडले.

सीसीटीव्ही फूटेज
ताब्यात घ्यावे
या प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची गरज असून, चौकशीसाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घ्यावे. महापालिकेने दिलेला भूखंड परत घेण्याची कार्यवाही सुरू करावी. महापालिकेने रुग्णालयाबरोबर करार करताना १० टक्के गरिबांवर मोफत उपचार करण्याची अट ठेवली होती. मात्र, पीडित वृद्धावर ते झालेले नाहीत. त्यामुळे रुग्णालयाने तीन महिन्यांत किती रुग्णांवर मोफत उपचार केले, याची माहिती संकलित करून कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महापौरांनाही ट्रस्टने डावलले
रुग्णालयाच्या कारभारावर देखरेख करण्यासाठी विश्वस्तांच्या यादीत महापौरांची नियुक्ती करावी, अशी अट भूखंड मंजूर केलेल्या महासभेच्या ठरावात होती. मात्र, विश्वस्त म्हणून महापौरांना कधीही बैठकीला बोलाविले नाही. परस्पर निर्णय घेतले जातात, असा आरोप पवार यांनी केला. त्यामुळे ट्रस्टच्या कागदपत्रांवर विश्वस्त म्हणून कोणाच्या सह्या होतात, याची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Obstacle of 85 year old for 21 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.