गणरायांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:54 PM2019-09-01T23:54:20+5:302019-09-01T23:54:40+5:30
अंतर्गत रस्त्यांची तात्पुरती डागडुजी निरर्थक : पावसाचा डांबरीकरणाला खोडा
डोंबिवली : गणेशोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होत असताना या पार्श्वभूमीवर खड्डेमय रस्त्यांची तात्पुरती केलेली डागडुजी निरर्थक ठरली आहे. खड्ड्यांच्या भोवताली मारलेले पॅच पुन्हा उखडल्याने खड्डेमय स्थिती निर्माण झाली. त्याचबरोबर कामाच्या गुणवत्तेचीही पोलखोल झाली आहे. यात शुक्रवारपासून पावसानेही हजेरी लावल्याने डांबरीकरणाच्या कामांनाही खोडा बसल्याने यंदाही गणरायांच्या आगमनाच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न कायम आहे.
बहुतांश रस्त्यांमधील खड्डे डांबरीकरणाने भरल्याचा दावा केडीएमसीकडून केला जात आहे. मात्र, अनेक भागांत आजही खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याप्रकरणी शनिवारी मनसेतर्फे डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून खड्डेरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्यात आता ज्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या जागी डांबरीकरणाचे पॅच मारले होते. तेही आता पूर्णपणे उखडले गेले आहेत. दोन दिवसांच्या पडलेल्या पावसाने डांबर वाहून गेल्याने पुन्हा खड्डे निर्माण झाल्याचे चित्र ठाकुर्लीतील म्हसोबा चौक ते पंचायत बावडीदरम्यान प्रामुख्याने दिसून येते. कोपर उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना बंदी घातल्याने म्हसोबा चौक ते पंचायत बावडी या मार्गानेच कल्याणमार्गे तसेच चोळगाव मार्गाने येणाऱ्या त्या वाहनांची वाहतूक होत आहे.
खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावून या ठिकाणी सद्य:स्थितीला कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती शहरात अन्य ठिकाणीही पाहायला मिळत आहे. खड्ड्यांच्या अवतीभोवती मारलेल्या पॅचच्या ठिकाणी डांबर निघू लागल्याने दुचाकी घसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे. पश्चिमेकडील बावनचाळीतील काँक्रिटीकरणाच्या रस्त्याला लागून असलेल्या डांबराच्या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. पश्चिमेला ज्या ठिकाणी गणपती मंदिराचा पादचारी पूल उतरतो, तिथेही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. दुसरीकडे पावसाचे आगमन झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. त्यामुळे डांबरीकरणाच्या कामांनाही ब्रेक लागल्याचे दिसत आहे. आधीच खड्डेमय रस्ते, त्यात तात्पुरती डागडुजी केलेले रस्त्यांवरील डांबरही निघून पुन्हा खड्डे निर्माण झाल्याचे चित्र कल्याण पश्चिम आणि पूर्व भागातही बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. खडी बाहेर निघाल्याने वाहनांच्या टायरमुळे उडून तिच्यामुळे दुखापत होण्याचीही भीती पादचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. रविवारीही पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने खड्डेमय स्थिती ‘जैसे थे’च राहण्याची चिन्हे आहेत.
डांबर टाकताना त्यातील तापमान योग्य पाहिजे, डांबराच्या जाडीचा थर समप्रमाणात असणे आवश्यक आहे. डांबराचा नमुना तपासणे महत्त्वाचे आहे. जेथे काम सुरू आहे, तिथे फिल्ड लॅब असणे बंधनकारक आहे, याकडे पुरते दुर्लक्ष झालेले आहे.
‘हे’ खड्डे कधी बुजविणार?
एकीकडे केडीएमसीने आपल्या अखत्यारीतील बहुतांश खड्डे डांबराने भरल्याचा दावा केला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला घरडा सर्कल ते टाटानाका या त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे भरायला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
खंबाळपाडा, न्यू कल्याण रोड म्हणून ओळखल्या जाणाºया या रस्त्याच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील चौक परिसराची खड्ड्यांनी पुरती चाळण केली आहे. पुढे विकासनाका परिसरातही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खंबाळपाडा रोडनजीकच चोळेगाव तलाव असून या ठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींना आणले जाते.
गणरायांचे आगमन खड्ड्यांतून होत असताना विसर्जनापूर्वी तरी हे खड्डे बुजतील का, असा सवाल गणेशभक्तांकडून उपस्थित केला जात आहे. खंबाळपाडा ते म्हसोबा चौकात जाणाºया ९० फूट रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य असून खोलवर गेलेल्या खड्ड्यांतून मार्ग काढताना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत.
कोपर उड्डाणपुलावरही खड्डे
कमकुवत झाल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केलेला डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणाºया कोपर उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
या पुलावरून सध्या अवजड वाहने वगळता अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे. पूल कमकुवत झाल्याने त्यावरील वजन कमी करण्यासाठी त्यावरील तीन ते चार इंच डांबराचा थर कमी केला आहे.
आता पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसाचे पाणीही साचत असल्याने खड्ड्यांची खोली समजून येत नसल्यामुळे येथून वाहन नेताना चालकांना कसरतच करावी लागत आहे.