मातृसुरक्षा दिनानिमित्त जिल्ह्यात आरोग्य पंधरवडा
By admin | Published: July 11, 2015 03:35 AM2015-07-11T03:35:37+5:302015-07-11T03:35:37+5:30
गर्भवतीचे आरोग्य उत्तम राहिल्यास जन्माला येणारी नवीन पिढी सुदृढ, निरोगी व कुपोषणविरहित राहण्यास मदत होईल. यासाठी राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनाचे औचित्य
ठाणे : गर्भवतीचे आरोग्य उत्तम राहिल्यास जन्माला येणारी नवीन पिढी सुदृढ, निरोगी व कुपोषणविरहित राहण्यास मदत होईल. यासाठी राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषद व सिव्हील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जिल्ह्यात शुक्रवारपासून (१० जुलै) आरोग्य पंधरवडा राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत आरोग्य पंधरवडा हाती घेण्यात आला आहे. यात रुग्ण मेळावे, महिला बचत गट मेळावे, अंगणवाडी केंद्रांतील कुपोषित बालकांची १०० टक्के तपासणी, दूषित पाण्याचे नमुने आढळलेल्या सुमारे ८२३ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील पिण्याच्या पाण्यातील क्लोरिनची कसून तपासणी, १० ते ५० वयोगटांतील सुमारे ५५ हजार ८६६ स्त्री-पुरुषांच्या हिमोग्लोबिनची तपासणी होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम मुरबाड येथून सुरू करण्यात आला आहे. या वेळी १२ हजार ४११ जणांची तपासणी झाली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.एम. पाटील, डॉ. बी.एस. सोनावणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)