ओखी चक्रीवादळ : डोंबिवलीत पावसाची रिमझिम, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 09:44 AM2017-12-05T09:44:31+5:302017-12-05T10:01:08+5:30
ओखी चक्री वादळाचा तडाखा, संततधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला आहे.
डोंबिवली - ओखी चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्यालाही बसला असून डोंबिवली आणि उपनगरात सोमवार (4 डिसेंबर) रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती. राज्य शासनाने सतर्कतेचा इशारा देत मुंबई, ठाणे भागातील शाळांना सुटी जाहीर केली, पण डोंबिवलीतील शाळा मात्र मंगळवारी नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
पहिल्या सत्रातील शाळा सकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास वेळापत्रकानुसार सुरु झाल्या, ठिकठिकाणी स्कूल बस विद्यार्थ्यांना पिक्अप करायला आल्या होत्या. सकाळच्या वेळेत साडेसहा ते नऊपर्यंत पावसाच्या कमी अधिक सरी बरसल्या, त्याचा आनंद लहानग्यांनी घेतला, तर पालकांची तारांबळ उडाली. चाकरमान्यांनी पावसातून वाट काढत रेल्वे स्थानक गाठले.
मंगळवारी (5 डिसेंबर)सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या कल्याण, ठाकुर्ली, दिवा आदी मार्गावर धुक्यासह पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे वातावरणात गारवा होता. धुक्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरिय वाहतूक मंदावली होती. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिरानं सुरू आहे. शहरानजीकच्या कल्याण ग्रामीणमध्येही गारवा, आणि वारा यामुळे नागरिकांनी थंडीचा आनंद लुटला, तेथेही धुके होते.
शहरातील रस्ते वाहतुकीचा वेग मात्र मंदावलेला होता. रिक्षा व अन्य वाहतूक सकाळच्या पहिल्या सत्रात नेहमीसारखी नव्हती,त्यामुळे पावसाच्या रिपरिप सुरु असतांना रिक्षा शोधतांना चाकरमान्यांची कसरत झाली. कल्याण-डोंबिवली परिवहनची वाहतूक निवासी भागात सुरु होती, पण लोढा, मानपाडा आदी भागात सकाळच्या वेळेत परिवहन सेवा नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी ९.१५ नंतर पावसाने उघडीप घेतली होती, पण गारवा आणि थंड वारा मात्र सुरु होता.