जकात केबिन गर्दुल्ल्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:01 AM2019-05-04T01:01:02+5:302019-05-04T01:01:17+5:30
जकातवसुलीसाठी बांधलेल्या केबिनकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने भिवंडी-वाडा रस्त्यावरील केबिन गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे.
भिवंडी : जकातवसुलीसाठी बांधलेल्या केबिनकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने भिवंडी-वाडा रस्त्यावरील केबिन गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे. या केबिनपासून १० ते १५ फुटांवर असलेल्या निजामपूर पोलीस ठाण्याच्या चौकीतील पोलीस या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करत असून या गैरप्रकारामुळे भविष्यात येथे गुन्हा घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारने मे २०१३ मध्ये जकात बंद करून अनुदान देण्याचे धोरण आखल्यानंतर पालिकेने जकातवसुलीच्या मालमत्ता बंद करून त्यामध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एलबीटीवसुली कार्यालयात नेमणूक केली. जकातीच्या मालमत्तेकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहा वर्षांपासून ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे या मालमत्तेची दुरवस्था झाली आहे. तर, भिवंडी-वाडा रस्त्यावरील जकातवसुलीच्या केबिनमध्ये मद्यपी, गर्दुल्ल्यांनी अतिक्रमण केले असून तेथे रात्रंदिवस चरस पित असतात. तसेच रात्रंदिवस जुगार खेळला जातो. या केबिनपासून काही अंतरावर निजामपूर पोलीस ठाण्याची चौकी असून त्यामधील पोलीस कर्मचारी भिवंडी-वाडा मार्गावरील अवजड वाहनचालकांकडून चिरीमिरी घेण्यात मग्न असतात.