अत्याचारप्रकरणी मायलेकाविरोधात गुन्हा
By admin | Published: May 6, 2017 05:49 AM2017-05-06T05:49:30+5:302017-05-06T05:49:30+5:30
परभणीतील चौदावर्षीय अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केल्याने ती गरोदर राहिल्यावर, तिचा गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : परभणीतील चौदावर्षीय अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केल्याने ती गरोदर राहिल्यावर, तिचा गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे नेणाऱ्या तिच्या मावस बहिणीच्या नवऱ्यावर व त्याच्या आईविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप त्या मायलेकाला अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
परभणीतील ही मुलगी तिच्या वडिलांच्या निधनानंतर नवी मुंबईत बहिणीकडे आली होती. याचदरम्यान, तिच्या मावस बहिणीचा नवरा आकाश हटकर याने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध जोडले. याचदरम्यान, ती गरोदर राहिल्यावरही आकाशने त्याच्या आईच्या (रेखा) सांगण्यावरून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्या मायलेकाने तिला गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे नेले. त्याचबरोबर आकाशचे नाव घेशील, तर याद राख, भावकीमध्ये तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली. हा प्रकार जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान नौपाडा परिसरातील पाचपाखाडी आणि तिच्या राहत्या घरी घडल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, उल्हासनगरमधील त्या मायलेकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवळे करीत आहेत.