सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अश्लिल ट्विट केल्याप्रकरणी वालचंद गिट्टे याच्याविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 08:01 PM2017-11-21T20:01:45+5:302017-11-21T20:02:05+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अश्लिल भाषा वापरणाऱ्याच्या विरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अश्लिल भाषा वापरणाऱ्याच्या विरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत फिर्याद दिली असून वर्तकनगर पोलिसांनी वालचंद गिट्टे याच्याविरुद्ध मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे.
सुप्रियाताई सुळे यांच्या ट्विट अकाउंटवर झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात रोष व्यक्त केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई यांच्याविरोधात त्यांच्या ट्विटवर अश्लिल भाषेत ट्विट केल्याचा प्रकार आमदार आव्हाड यांच्या निदर्शनास आला असता त्यांनी याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सुप्रियाताई यांच्या ट्विट अकाऊंटवर वालचंद याने त्यांच्याबद्दल अश्लिल भाषेत टिपण्णी केली. १५ आणि १९ नोव्हेंबर २०१७ रोजी हे लिखाण केले आहे. त्यामुळे सुप्रियाताई यांची बदनामी झाल्याने कळवा मुंब्रा विधानसभा आव्हाड यांनी मंगळवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३५४(ड) विनयभंग, ५०९, ५०० आणि ६७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.