कल्याणमध्ये बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:33 AM2017-08-11T05:33:07+5:302017-08-11T05:33:07+5:30
पश्चिमेला रेल्वेस्थानक परिसरात बसस्टॉपसमोर भररस्त्यात रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोन रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल केला. वशिष्ठ भालेराव (रा. मोहने) व राजेश दुबे (रा. आंबिवली) अशी या बेशिस्त रिक्षाचालकांची नावे आहेत.
कल्याण : पश्चिमेला रेल्वेस्थानक परिसरात बसस्टॉपसमोर भररस्त्यात रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोन रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल केला. वशिष्ठ भालेराव (रा. मोहने) व राजेश दुबे (रा. आंबिवली) अशी या बेशिस्त रिक्षाचालकांची नावे आहेत.
कल्याण स्थानक परिसरात नेहमीच कशाही रिक्षा उभ्या करून प्रवासी घेतले जातात. त्यामुळे तेथे प्रचंड वाहतूककोंडी होती. त्याचा सामना खाजगी वाहनचालक, एसटी-केडीएमटी बसचालक, नागरिक व प्रवासी यांना करावा लागतो. पश्चिमेला सरकत्या जिन्यालगत उल्हासनगरकडे जाणाºया रिक्षांसाठी स्टॅण्ड आहे. याव्यतिरिक्त मुख्य रस्त्यावर रिक्षाचालकांनी स्वत:हून एक बेकायदा स्टॅण्ड सुरू केले आहे. खडकपाडा, लालचौकी, दुर्गाडीकडे जाण्यासाठी असलेल्या रिक्षा स्टॅण्डपाठोपाठ अन्य एक स्टॅण्ड आहे. दीपक हॉटेलसमोरून बेकायदा रिक्षा प्रवासी भाडे भरले जाते. त्यामुळे तिथे वाहतूककोंडी होते. केडीएमटीच्या बसही तेथे उभ्या करता येत नाहीत. कल्याण एसटी बस डेपोच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोर रिक्षा उभ्या केल्या जातात. रिक्षाचालकही तेथे रस्त्यात रिक्षा उभ्या करून भिवंडी, टाटानाका, चक्कीनाका येथे जाणारे प्रवासी भरतात. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केल्यास स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल.
रिक्षाचालक स्टेशन परिसरातून नेहमीच जवळचे भाडे नाकारतात. तसेच स्टेशन परिसरातून बेकायदा चौथी सीट घेतात. त्याचबरोबर कल्याणहून डोंबिवलीला जाणाºया प्रवाशांची ते अडवणूक करतात. चौथी सीट न मिळाल्यास उर्वरित तीन प्रवाशांना बहुतांश वेळा ताटकळत ठेवले जाते. विशेषत: भोईरवाडी व खंबाळपाड्याकडे जाणाºया प्रवाशांची रिक्षाचालक कोंडी करतात. चौथी सीट घेतल्याशिवाय प्रवासफेरी परवडत नाही, असे कारण रिक्षाचालक देतात. प्रत्यक्षात कल्याण ते डोंबिवली या सहा किलोमीटरसाठी प्रतिसीट शेअर भाडे २२ रुपये आहे. तीन प्रवासी घेतल्यास एका फेरीमागे ६६ रुपये रिक्षाचालकाला मिळतात. त्यात त्याचे एक लीटरही पेट्रोल खर्च होत नाही. एका लीटरमध्ये त्यांच्या दोन फेºया होतात. मात्र, डोंबिवली ते कल्याण प्रवासासाठी प्रतिसीटसाठी २५ रुपये भाडे आकारले जाते. जाताना २२ व येताना २५ रुपये हा हिशेब कोणी ठरवून दिला. त्यावर, आरटीओचे नियंत्रण का नाही? आरटीओ व वाहतूक पोलिसांनी याचीही झाडाझडती घ्यावी, अशी अपेक्षा प्रवासी करत आहेत.
डोंबिवलीत सात रिक्षा जप्त
डोंबिवली : शहरातील बेकायदा रिक्षांविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची मोहीम सुरूच आहे. गुरुवारी ६१९ हून अधिक रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात रिक्षा जप्त करण्यात आल्या असून त्या कल्याणमधील आरटीओ कार्यालयात नेण्यात आल्या. तर, नोटीस बजावलेल्या ३४ रिक्षांच्या चालकमालकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
पूर्वेतील रामनगर भागात केळकर रोड, एस.व्ही. रोड आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही काळ वातावरण तंग होते. रिक्षा युनियननेही बेकायदा रिक्षांवर कारवाईची मागणी केली आहे. परिणामी, त्याचा फटका कारवाईला बसला नाही. नागरिकांनीही या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.
बेकायदा रिक्षांबरोबरच बेकायदा प्रवासी वाहतुकीलाही आळा बसावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रवाशांनीही चौथ्या सीटवरील जीवघेणा प्रवास टाळावा, अशी जागृती काही दिवसांपूर्वीच प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाले मंचने केली आहे.