गणेशाच्या चरणी अर्पण करा एक वही आणि एक पेन, झेप प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम

By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 30, 2022 03:38 PM2022-08-30T15:38:27+5:302022-08-30T15:38:45+5:30

आदीवासी पाड्यातील होतकरु विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी झेप प्रतिष्ठानने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे.

Offer a notebook and a pen to Ganesha an educational initiative of Zep Pratishthan | गणेशाच्या चरणी अर्पण करा एक वही आणि एक पेन, झेप प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम

गणेशाच्या चरणी अर्पण करा एक वही आणि एक पेन, झेप प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम

googlenewsNext

ठाणे : 

आदीवासी पाड्यातील होतकरु विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी झेप प्रतिष्ठानने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बुधवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवनिमित्त झेपने शैक्षणिक उपक्रम सुरु केला आहे. हार, फुले आणि प्रसादाबरोबर एक वही आणि एक पेन गणेशाच्या चरणी अर्पण करण्याचे आवाहन सर्व भाविकांना झेपने केेले आहे.

झेप प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या अकरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. जवळपास ६५ हून अधिक शैक्षणिक उपक्रम या संस्थेने राबवले आहेत. जव्हार येथील आदिवासी पाड्यात तसेच शहरातील होतकरू मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे. यंदा गणेशोत्सवाच्यानिमित्ताने एक वही एक पेन हा उपक्रम हाती घेतला आहे. जव्हारपासून ४० किमी अंतरावर बेहेरपाडा या आदीवासी गावात शिक्षणाची मदत पोहोचवली जाणार आहे. या पाड्यात २१४ आदीवासी मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांचे पालक वीटभट्टीवरील कामगार आहेत. त्यांची मुले ही शिक्षणपासून वंचित राहू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही झेपने त्यांना मदतीचा हात देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी झेप प्रतिष्ठान या उपक्रमाची सुरुवात गणेशोत्सवकाळात करत असते. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्षे असून या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवात भाविकांना हार, फुले व मिठाई सोबतच एक वही आणि एक पेन आणण्याचे आवाहन केले जाते. गणेशोत्सवात जमा केलेली ही मदत आदिवासी पाड्यावरील होतकरू मुलांना पोहोचवण्यात येते. एक वही एक पेन उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवण्यात आलेली आहे अशी माहिती झेपचे संस्थापक अध्यक्ष विकास धनवडे यांनी दिली. ठाण्यातील विविध गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना अशाप्रकारे शैक्षणिक साहित्य जमा करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. उत्सवानंतर संस्थेचे कार्यकर्ते घरोघरी तसेच मंडळात जाऊन हे साहित्य जमा करणार असल्याचे धनवडे यांनी सांगितले.

Web Title: Offer a notebook and a pen to Ganesha an educational initiative of Zep Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.