ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभांच्या मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्याना मिळाले प्रशिक्षण
By सुरेश लोखंडे | Published: April 6, 2024 07:29 PM2024-04-06T19:29:03+5:302024-04-06T19:29:12+5:30
उर्वरीत मतदारसंघांमध्ये रविवारी हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले जाणार आहे.
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभांसाठी २० रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याभरातील सहा हजार ५९२ मतदान केंद्रांवरील तब्बल ४५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना आजपासून दोन दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षण दिले जात आहे. त्याप्रमाणे आजच्य पहिल्या दिवशी तब्बल सात विधानसभा मतदारसंघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहे. उर्वरीत मतदारसंघांमध्ये रविवारी हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले जाणार आहे.
जिल्ह्यातील या लाेकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. या निवडणूक कामासाठी तैनात केलेल्या तब्बल ४५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे देण्यास आजपासून प्रारंभ झालेला आहे. आजच्या पहिल्या दिवशी कल्याण पश्चिमेसह कल्याण ग्रामीण मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवरील कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. याप्रमाणेच भिवंडी पूर्व, मीरा भाईंदरच्या कर्मचाऱ्यांना डाॅ. घाणेकर नाट्यगृहात आज प्रशिक्षण मिळाले. याशिवाय काेपरी पाचपाखाडी, ऐराेली आणि बेलापूर येथील मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आज प्रशिक्षणाचा पहिला दिवस पूर्ण केलेला आहे.
जिल्ह्यातील या निवडणुकीच्या कामासाठी सर्व सरकारी, निमसरकारी, सहकार आदी विभागांसह पोलिस यंत्रणा मिळून जिल्ह्यातील या तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी ६५ हजारांवर मनुष्यबळ लागणार आहे. त्यापैकी मतदान केंद्रांवरील अधिकारी कर्मचाऱ्याना आजपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये सर्व केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांंचे प्रशिक्षण पार पडले. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीन हाताळणी कशी करायचे यासह या मतदान केंद्रावर करायची कार्यवाही, टपाली मतदानाबाबतची माहिती अर्जामध्ये भरून घेणे, मतदान केंद्रावरील करायच्या कार्यवाहीबाबत माहिती आजच्या पहिल्या प्रशिक्षणात देण्यात आली आहे. याशिवाय टेबलनिहाय हजेरीपट तयार करणे, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची माहिती देऊन माहिती पुस्तिका व निवडणूक संबंधी इतर नमुन्याचे वाटप या वेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांना करण्यात आले.