अधिकाऱ्यांच्या माथी स्वच्छता मोड अॅप; पालिका स्वच्छतेत अव्वल ठरण्यासाठीचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 04:27 PM2017-12-11T16:27:02+5:302017-12-11T16:27:29+5:30
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेचा यंदाच्या स्वच्छता सर्व्हेक्षण 2018मध्ये अव्वल क्रमांक येण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी आयोजित बैठकीत सफाई कामगारापासून ते वरिष्ठ अधिका-यांना स्वच्छता मोड मोबाईल अॅप अधिकाधिक लोकांना डाऊनलोड करण्याकरिता प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेचा यंदाच्या स्वच्छता सर्व्हेक्षण 2018मध्ये अव्वल क्रमांक येण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी आयोजित बैठकीत सफाई कामगारापासून ते वरिष्ठ अधिका-यांना स्वच्छता मोड मोबाईल अॅप अधिकाधिक लोकांना डाऊनलोड करण्याकरिता प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या अॅपद्वारे लोकांनी पालिकेच्या स्वच्छतेला अधिकाधिक समाधानकारक ठरविल्यास पालिकेचा स्वच्छता सर्व्हेक्षणात वरचा क्रमांक लागण्याची शक्यता यामागे वर्तविली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छतेची पारदर्शक मोहीम सुरू केल्यानंतर शहराच्या स्वच्छतेला गती मिळू लागली. मात्र ती ठराविक काळापुरती मर्यादित न राहता कायमस्वरुपी राखण्यात यावी, यासाठी मात्र ठोस उपाय योजले जात नसले तरी गांधी जयंतीला मात्र स्वच्छतेची आठवण सर्वच क्षेत्रात हिरिरीने ठेवली जाते. स्थानिक प्रशासनाच्या स्वच्छतेला प्रोत्साहित करण्यासाठी गेल्या वर्षापासून केंद्र सरकारने देशभर स्वच्छता सर्व्हेक्षण सुरू केल्याने सर्व स्थानिक प्रशासनाची स्वच्छता राखण्यात चढाओढ सुरू झाली. मीरा-भार्इंदर पालिकेने देखील व्हीएमएस माय सिटी हे असुविधांची तक्रार करणारे मोबाईल अॅप सुरू केले. त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वच्छता मोड हे अॅप सुरू करण्यात आले. त्यामुळे पालिकेने सुरू केलेले माय सिटी अॅप मागे पडून नवीन स्वच्छता मोड अॅपला प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात आले.
या अॅपद्वारे शहरातील स्वच्छतेला गुण देण्याचे आवाहन प्रशासनाकडून सुरू करण्यात आले. अखेर पार पडलेल्या सर्व्हेक्षणात पालिकेने देशात १३० वा तर राज्यात ९ वा क्रमांक पटकावला. त्यावेळी १०० टक्के कचरा वर्गीकरणासह हगणदारीमुक्ती व स्वच्छता मोडच्या असमाधानकारक प्रतिसादाने पालिकेचा घात केला. त्यामुळे यंदा प्रशासनाने शहराला १०० टक्के हगणदारीमुक्त केल्यासह कचरा वर्गीकरणाला प्राधान्य दिले.
मात्र यावर समाधान न मानता आयुक्तांनी यंदाच्या सर्व्हेक्षणात पालिकेला अव्वल क्रमांक मिळवण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील स्वच्छतेच्या आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सोमवारी सर्व अधिका-यांची आपल्या दालनात बैठक आयोजित केली होती. त्यात त्यांनी सर्व अधिका-यांना स्वच्छता मोड हे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट सफाई कामगारापासून ते वरिष्ठ अधिका-यांना दिले. त्यात शहरातील विविध भागांतील स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या 24 पालक अधिका-यांसह सर्व विभागप्रमुख, प्रभाग अधिकाऱ्यांना १ हजार, बाजार विभाग प्रमुख नरेंद्र पाटील यांना २५ हजार, शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांना २० हजार, उद्यान अधीक्षक नागेश विरकर, हंसराज मेश्राम यांना प्रत्येकी २ हजार, लिपिक ते सफाई कामगारांना किमान १०० नागरिकांना ते अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी शहरातील स्वच्छतेचा समाधानकारक प्रतिसाद लोकांकडून त्या अॅपद्वारे मिळविण्याच्या कामाला लागल्याचे सांगण्यात आले. या बैठकीनंतर आयुक्तांनी भार्इंदर पश्चिमेकडील रिना मेहता महाविद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेसह ते अॅप डाऊनलोड करण्यासाठी लोकांना आवाहन करण्याबाबत मार्गदर्शन केले.