वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेची अधिकाऱ्यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 11:27 PM2021-02-08T23:27:46+5:302021-02-08T23:27:57+5:30
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छाया उपजिल्हा रुग्णालय, उल्हासनगर येथील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयाचीही पाहणी केली.
अंबरनाथ : पूर्व भागातील २६ एकर सरकारी जागेवर ठाणे जिल्ह्याकरिता वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चार वरीष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. सोमवारी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेची पाहणी सहसंचालक डॉ. चंदनवाले यांनी केली. त्याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छाया उपजिल्हा रुग्णालय, उल्हासनगर येथील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयाचीही पाहणी केली.
अंबरनाथ नगरपालिका हद्दीत वैद्यकीय कॉलेज उभारण्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव तयार करण्याची मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. ही जागा शेतकी सोसायटीच्या अंतर्गत असून त्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे असल्याने या जागेचे हस्तांतरण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
अंबरनाथ नगरपालिका हद्दीत ही जागा असून या जागेबाबत योग्य अहवाल सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिकेच्या नगरविकास विभागाच्या या अधिकाऱ्यांनीही या जागेबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार किणीकर यांनी दिल्या. यावेळी प्रांत अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार जयराज देशमुख, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, शहर संघटक सुनील चौधरी, उपशहरप्रमुख सुभाष साळुंखे, तुळशीराम चौधरी, छाया हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिष पाटोळे आदी उपस्थित होते.