माजी नगरसेवकाने अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 07:39 PM2022-09-21T19:39:53+5:302022-09-21T19:40:42+5:30
नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी आज पालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रेल्वे पादाचारी पुलाची पाहणी केली.
अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याच्या विरोधात पालिका अधिकाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. याच माजी नगरसेवकांने काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना बैठकीत आमदारांच्या समोर अधिकाऱ्यांना शिवी घातली होती.
नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी आज पालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रेल्वे पादाचारी पुलाची पाहणी केली. रेल्वे पादाचारी पुलावर पालिकेला थेट काम करता येत नसल्याने पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडले होते. मात्र साळुंखे यांनी या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी या मागणीच्या अनुषंगाने पालिकेचे शहर अभियंता अशोक पाटील, उप अभियंता पंकज पन्हाळे आणि पालिकेचे कनिष्ठ अभियंता राजेश तडवी यांच्यासह पाहणी केली. मात्र यावेळेस देखील साळुंखे यांचा तोल घसरला आणि त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी सुरू केली.
चार दिवसांपूर्वी सुभाष साळुंखे यांनी पालिका सभागृहात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आमदारांच्या समोरच पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. शिवीगाळचा प्रकरण ताजा असतानाच आता पुन्हा अधिकाऱ्यांना अर्वाच्या भाषेत दम दिल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुपारनंतर काम बंद आंदोलन केले. दरम्यान आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी बोलावलेल्या शहर विकासाच्या कामांचा आढावा बैठकीत साळुंखे यांनी आरोग्य अधिकाऱ्याला दिलेली शिवी मोबाईल मध्ये कैद झाल्याने या शिवीगाळ प्रकरणी सर्व अधिकाऱ्यांनी पेनडाऊन आंदोलन करून सुभाष साळुंखे याचा निषेध व्यक्त केला.