सरकारी तूरडाळीची रिकामी पाकिटे सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:24 AM2018-08-24T00:24:44+5:302018-08-24T00:29:16+5:30
प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष, ठाणे कार्यालयास कळवले
मीरा रोड : मीरा रोडच्या प्लेझंट पार्क भागात एका जागेवर पडलेली सरकारी तूरडाळीची रिकामी पाकिटे सापडली. मात्र मीरा - भार्इंदर शिधावाटप कार्यालयाकडून पंचनामा करूनही ती ताब्यात घेण्यात आली नाहीत. त्यामुळे प्रशासनच गंभीर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी ठाणे कार्यालयास कळवण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करू असे सहायक शिधावाटप अधिकाऱ्यांनी सांगितले.
मीरा- भार्इंदरमध्ये १२१ शिधावाटप दुकाने असून सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून येणाºया तूरडाळीपैकी सध्या केवळ २० दुकानांमध्ये २२ हजार किलो तूरडाळीचा पुरवठा झालेला आहे. तर उर्वरित दुकानांना अजूनही तूरडाळ मिळालेली नाही.सरकारकडून येणारी तूरडाळ एक किलोच्या बंद पाकिटात येते. शिधावाटप दुकानांवर ती ३५ रुपये किलोने विकली जाते. महत्वाचे म्हणजे एका कार्डधारकासाठी एक किलोच तूरडाळ दिली जाते. तूरडाळच नव्हे तर शिधावाटप दुकानावरून कुठलीही सरकारकडून येणारी वस्तू घ्यायची असेल तर यंत्रावर अंगठा जुळल्याशिवाय त्याची पावती येत नाही.
तूरडाळीची शिधावाटप दुकानांवर टंचाई असताना दुसरीकडे मीरा रोडच्या प्लेझंट पार्कपासून मीरा गावकडे जाणाºया मार्गावरील एका जागेवर सरकारी तूरडाळीची असंख्य रिकामी पाकिटे टाकण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी शिवमावळा प्रतिष्ठानचे नामदेव काशिद यांना ही बाब कळताच त्यांनी याची माहिती शिधावाटप अधिकाºयांना कळवली. पाकिटांवर जून २०१८ छापलेले आहे. शिधावाटप अधिकाºयांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
सरकार व संबंधित विभागाचे नाव छापलेली रिकामी पाकिटे ही सरकारी तूरडाळीची असल्याची खात्री पटल्यावर त्याची नोंद करून घेत ठाणे कार्यालयास पत्र पाठवले आहे.
घटनास्थळी पडलेली सर्व पाकिटे जप्त करून घेणे आवश्यक असताना शिधावाटप अधिकाºयांनी ती ताब्यात घेतलीच नाहीत. वास्तविक पाकिटांची संख्या, त्याचा बॅच क्रमांक, दिनांक आदीची सविस्तर नोंद करून घेणे आवश्यक होते. यामुळे सरकारी तूरडाळीचा काळाबाजार केला जात असल्याची शक्यता बळावली आहे. मनसेनेही चौकशीची मागणी केली आहे.
ठाणे कार्यालयातून अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारी तूरडाळीची रिकामी ५० ते ६० पाकिटे सापडली आहेत. त्याच्या पडताळणीसाठी ठाणे कार्यालयास पत्र दिले आहे. त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.
- गणेश किरपाने, सहायक शिधावाटप अधिकारी.