भिवंडीतील डीप क्लीन ड्राईव्हसाठी पालिका आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी रस्त्यावर
By नितीन पंडित | Published: January 1, 2024 06:20 PM2024-01-01T18:20:21+5:302024-01-01T18:20:41+5:30
डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता अभियानाचा शुभारंभ एस टी स्थानक ते नागाव या रस्त्यावर आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.
भिवंडी: सध्या राज्यासह देशभर स्वच्छता अभियान राबवण्याचे वेध लागले असताना भिवंडीत महानगरपालिका प्रशासना तर्फे पाच प्रभाग समिती अंतर्गत राबविण्यात आलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता अभियानाचा शुभारंभ एस टी स्थानक ते नागाव या रस्त्यावर आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमात अतिरिक्त आयुक्त विठ्ठल ठाके, संजय हिरवाडे, उपायुक्त दीपक झिंजाड, प्रणाली घोंगे यांसह सर्व विभाग प्रमुख कर्मचारी यांनी हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवले.
यावेळी स्वच्छता झालेल्या रस्त्यावर रस्ते दुभाजक व रस्ते हे पाण्याने धुण्यात आले. हे स्वच्छता अभियान यापुढे निरंतर सुरू राहणार असून या मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी अधिकारी सहभागी होत असताना नागरिकांनी सुध्दा शहर स्वच्छते साठी पुढाकार घेत आपला कचरा विहित वेळेत योग्य ठिकाणी जमा करावा असे आवाहन शहरातील नागरिकांना आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.या व्यतिरिक्त शहरातील अमजदिया मशीद ते गणेश सोसायटी, आसबिबी मशीद ते मानसरोवर, गोल्डन हॉटेल ते भंडारी कंपाऊंड, तीनबत्ती ते पालिका मुख्यालय या दरम्यान सुध्दा डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता अभियान राबविण्यात आले.