अधिकाऱ्यांनी अन्न, औषधांचा दर्जा, मुदत, स्वच्छतेची नियमितपणे तपासणी करण्याची गरज!

By सुरेश लोखंडे | Published: July 31, 2023 09:33 PM2023-07-31T21:33:07+5:302023-07-31T21:33:15+5:30

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान

Officials need to check food, medicine quality, term, hygiene regularly says Minister Atram | अधिकाऱ्यांनी अन्न, औषधांचा दर्जा, मुदत, स्वच्छतेची नियमितपणे तपासणी करण्याची गरज!

अधिकाऱ्यांनी अन्न, औषधांचा दर्जा, मुदत, स्वच्छतेची नियमितपणे तपासणी करण्याची गरज!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: थेट जनतेच्या जीविताशी संबंध असलेला अन्न व औषध प्रशासन विभाग फार महत्त्वाचा आहे. शासनाच्या या अत्यंत महत्त्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कर्तव्य बजावण्याची गरज आहे. त्यांनी अन्न व औषध औषधे याचा दर्जा, मुदत, स्वच्छता आदी बाबींची नियमितपणे तपासणी करावी. दूध व त्या व्यवसायाशी संबंधित स्वच्छतेबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे आहे आदी जाणीव अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ठाण्यातील कोकण विभागीय आढावा बैठकीत अधिकार्यांना करून देत त्यांची कान उघाडणी केली.

अन्न व औषध प्रशासन या महत्त्वाच्या विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायम सजग राहून जबाबदारीने काम करण्याची गरज आत्राम यांनी      ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात सोमवारी घेतलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाची कोकण विभागीय आढावा बैठकीत सांगितले. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यासह सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख, सहआयुक्त (औषधे) दुष्यंत भामरे, विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी मंत्री  आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या बैठकीत सहआयुक्त शसुरेश देशमुख व दुष्यंत भामरे यांनी विभागातील पदांची सद्य:स्थिती, गेल्या सहा महिन्यातील कामकाजाची, केलेल्या कारवायांची माहिती या बैठकीत दिली. कोकण विभागातील अन्न व औषध प्रशासन (अन्न) या विभागात एकूण १४१ अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून त्यापैकी ६९ पदे कार्यरत. तर ७२ पदे रिक्त आहेत, कर्मचाऱ्यांची ४१ पदे मंजूर असून त्यापैकी १७ कार्यरत तर २४ पदे रिक्त आहेत. वर्ग चारची २० पदे मंजूर असून त्यापैकी सहा कार्यरत तर १४ पदे रिक्त आहेत आणि कंत्राटी कर्मचारी २१८ पदे मंजूर असून त्यापैकी १०३ पदे कार्यरत तर ११५ पदे रिक्त असल्याची माहिती श देशमुख यांनी दिली. 

ठाणे जिल्ह्यात परवानाधारकांची संख्या २२ हजार ८२१ आहेत.  तर नोंदणीधारकांची संख्या ८७ हजार  सहा अशी एकूण मिळून एक लाख लाख ९ हजार ८२७ आहे. त्यांच्याकडून एक कोटी १४ लाख २७ हजार ४०० रुपये इतके शुल्क जमा झाले आहे. याप्रमाणेच संपूर्ण कोकण विभागात परवानाधारकांची संख्या ३७१ व नोंदणीधारकांची संख्या एक लाख ६८ हजार १०८ असे एकूण दोन लाख पाच हजार १६९ आहे. त्यांच्याकडून एक कोटी ६८ लाख २७ हजार २०० रुपये शुल्क जमा करण्यात आले आहे.

याचबरोबर औषधे विभागाची माहिती देताना सहआयुक्त (औषधे) शदुष्यंत भामरे यांनी सांगितले की, कोकण विभागात औषधे या विभागातील अधिकाऱ्यांची एकूण १५ पदे मंजूर असून त्यापैकी ११ पदे कार्यरत आहेत तर तीन पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची ४३ पदे मंजूर आहेत, त्यापैकी १५ पदे कार्यरत व २८ पदे रिक्त आहेत. कोकण विभागातील एकूण १७३ ॲलोपॅथिक औषधी उत्पादक जागतिक आरोग्य संघटनेच्या धोरणानुसार निकष पाळत असल्यामुळे ते डब्ल्यूएच जीएमटी प्रमाणपत्रधारक आहेत. या विभागात सात हजार ५८ घाऊक औषध विक्रेते असून एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत १७८ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३८ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, १६ परवाने निलंबित करण्यात आले तर आठ परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती भामरे यांनी दिली.

उत्कृष्ठ अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सन्मान

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या ईट राईट चँलेंज स्पर्धेत मीरा-भाईंदर, वाशी नवी मुंबई व ठाणे या या शहरांनी अन्न सुरक्षा मध्ये उच्च गुणांकन मिळविल्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते व अन्न सुरक्षा आयुक्त.अभिमन्यू काळे  यांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासनातील सहाय्यक आयुक्त दिगंबर भोगावडे, परमेश्वर सिंगरवाड, व्यंकटेश वेदपाठक तसेच अन्न सुरक्षा अधिकारी उत्तरेश्वर बडे,अरविंद खडके, डॉ.राम मुंडे, संतोष शिरोशिया यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Officials need to check food, medicine quality, term, hygiene regularly says Minister Atram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे