जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी आता शेतकऱ्यांसोबत दोन महिने राबणार शेतात!
By सुरेश लोखंडे | Published: September 1, 2022 09:21 PM2022-09-01T21:21:01+5:302022-09-01T21:22:26+5:30
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत राबवण्यात येत आहे.
ठाणे : जिल्ह्यासह राज्य भरातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे प्रश्न प्रशासनाने समजून घेत त्यावर कोणत्या उपाययोजना, धोरणात्मक निर्णय घ्यावेत, यासाठी राज्य शासनाने प्रशासनातील राज्य व जिल्हास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, एसडीओ, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींना आता महिन्यातून तीन दिवसव महसूल, ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकऱ्यांनी महिन्यातून एक दिवस गावांना भेटी द्यायच्या आहेत. यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत राबवण्यात येत आहे. त्यासााठी ठाणे जिल्ह्यातही या उपक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
‘माझा एक दिवस माज्या बळीराजासाठी’या उपक्रमामध्ये प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यासोबत राहून त्यांना दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणीवर त्यांच्या सोबत, त्यांच्या विविध कामात सहभाग घेवून चर्चा करणेअपेक्षित आहे. उपक्रमात खासदार,आमदार व इतर लोकप्रतिनिधीना सहभागी करुन घेणे आवश्यक केले आहे. यामध्ये प्रधान सचिव, कृष आयुक्त, कृषि संचालक, विद्यापीठस्तर शास्त्रज्ञ, अधिकारी कृषि विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठांचे विभाग प्रमुख, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता आदी राज्यस्तरीय अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतावर राबणार आहेत.
या राज्यस्तरीय अधिकाऱ्यास विभागस्तर अधिकाऱ्यांमध्ये विभागीय आयुक्त, विभागीय कृषि सहसंचालक. तर जिल्हास्तर अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य जि.प.चे सीईओ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक, आत्मा, कृषि विकास अधिकारी, कृषि उपसंचालक, प्रकल्प उपसंचालक आदी अधिकारी शेतकऱ्यांसोबत राहून त्यांना धीर देत त्यांच्या समस्या, अडचणींवर मात करण्याचा तोडगा काढणार आहे. महसूलचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषि अधिकारी व इतर तालुकास्तरीय अधिकारी या उपक्रमामध्ये उपरोक्त उल्लेख केलेल्या कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस गावांना भेटी द्यायच्या आहेत. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ गावांची व शेतकऱ्यांची निवड करण्याचे निकष निश्चित केल्याच्या वृत्तास जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी दुजारा दिला आहे.