माहिती अधिकार कार्यकर्त्यांविरुद्ध अधिकारी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:46 AM2021-09-12T04:46:21+5:302021-09-12T04:46:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेतील १७ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह महापौर, पालिका आयुक्त आदींकडे लेखी तक्रार करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेतील १७ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह महापौर, पालिका आयुक्त आदींकडे लेखी तक्रार करून माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर ब्लँकमेलिंगसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्यासह चंद्रकांत बोरसे, सुदाम गोडसे, अविनाश जाधव, राज घरत, संजय दोंदे, नितीन मुकणे, नरेंद्र चव्हाण, जगदीश भोपतराव, किरण राठोड, यतीन जाधव, सुनील यादव, दिलीप जगदाळे, चारुशीला खरपडे, मंजिरी डिमेलो, दीपाली जोशी, दामोदर संख्ये या १७ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, स्थायी समिती सभापती दिनेश जैन आदींना लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
तक्रार अर्जात अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, मीरा-भाईंदर मनपा आस्थापनेवर १,२२५ अधिकारी - कर्मचारी आहेत. हा कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने माहिती अधिकार कायद्याखाली केलेल्या अर्जावर कारवाईस विलंब होतो, तसेच नजरचुकीने चुका होत असतात. काही माहिती अधिकार अर्जदार हे सर्व विभागांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने वारंवार अर्ज करतात. माहिती अधिकार अर्जाचे प्रमाण बरेच असल्याने निपटारा करणे अशक्य होत चालले आहे. माहिती अधिकाराचे अर्ज निकाली काढण्यासाठी वेगळा कर्मचारी वर्ग नाही.
माहिती अधिकारात आस्थापना विभागाकडून अधिकारी - कर्मचारी यांची माहिती घेऊन काही अर्जदार हे धमकवण्याचा प्रयत्न करतात. तसेच अधिकारी - कर्मचारी यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी करून दडपण आणण्याचा प्रयत्न करतात. शासन आणि आयुक्तांकडे तक्रारी करून कार्यवाही करण्यास भाग पाडतात. यामुळे कारणे दाखवा नोटिसांपासून निलंबनाच्या कारवाईपर्यंत अधिकारी - कर्मचारी यांना सामोरे जावे लागते.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून दबाव आणून चुकीचे काम करून घेण्याचा प्रयत्न होतो तसेच आर्थिक मागणी केली जाते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची वारंवार माहिती घेणाऱ्या तसेच सतत खोट्या तक्रारी करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी काय जनहित साध्य केले, याची चौकशी करून त्यांच्यावर ब्लॅकमेलिंगसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या १७ अधिकाऱ्यांनी केली आहे.
सतत तक्रारी करून पैशांसाठी देतात त्रास
महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या दालनात सोमवारी महापालिका आयुक्त दिलीप ढोले व अन्य काही अधिकाऱ्यांची सुमारे तासभर बैठक झाली. बैठकीत काही जण सतत माहिती अधिकाराचे अर्ज करून व त्या आधारे तक्रारी करून पैशांसाठी त्रास देतात त्यांची यादी तयार करून पोलिसांकडे सुपुर्द करण्याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
.........