अंगणवाडीसेविकांचे मोबाईल स्वीकारण्यास अधिकाऱ्यांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:44 AM2021-08-24T04:44:31+5:302021-08-24T04:44:31+5:30
ठाणे : निकृष्ट दर्जाचे मोबाईल शासनाला परत करण्यासाठी ठाणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणच्या प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी सेविका सोमवारी आल्या होत्या. ...
ठाणे : निकृष्ट दर्जाचे मोबाईल शासनाला परत करण्यासाठी ठाणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणच्या प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी सेविका सोमवारी आल्या होत्या. परंतु, त्यांना अडवून त्यांचे मोबाईल स्वीकारण्यास अंबरनाथसह अन्य ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सेविका व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकांना दिलेल्या २ जीबी रॅमच्या आणि त्यात क्षमतेपेक्षा जास्त लाभार्थांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती महिलांची माहिती, पोषण आहाराचे वाटप आदींची नोंद ठेवावी लागते. पण, कमी क्षमतेचे हे मोबाईल आता हँग होत आहेत. याशिवाय त्यावर काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्यात १७ ऑगस्टपासून ते शासनाला परत केले जात आहेत. सोमवारी ठाणे शहरातील माजीवडा, बाळकूम, राबोडी, नळपाडा, गांधीनगर आदींसह शहापूर, डोळखांब, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ येथे अंगणवाडी सेविकांनी मोबाईल सुपूर्द केले. मात्र, ते स्वीकारून त्यांची पोहोच देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे सेविकांनी घोषणाबाजी केली. यादरम्यान अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमकी उडाल्या.